शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर ग्रामपंचायत अंतर्गत जल जिवन मिशन योजनेद्वारे ७ करोड रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली.
सदर कामात अनियमितता आढळून आली असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची जबाबदारीद्वारे चौकशी करायला कुठलाही अधिकारी तयार नाही.यामुळे संबंधित अधिकारी बिडात दडले आहेत काय?असा खोचक प्रश्न प्रशासक उपसरपंच अशोक चौधरी यांनी केला आहे.
जल जिवन मिशन अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या भ्रष्ट्र कामाची तक्रार जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
याचबरोबर सदर तक्रारीच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य मुंबई,मंत्री,जलपुरवठा व स्वच्छता विभाग,महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार विधिमंडळ विरोधी पक्षनेते,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रपूर,कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर,पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन चिमूर,तहसीलदार तहसील कार्यालय चिमूर,पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन भिसी,यांना देण्यात आलेल्या आहेत.
तक्रारीत म्हटले आहे की,मौजा शंकरपूर (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथील जल जीवन मिशन अंतर्गत अंदाजे रु. ७ कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेतील गंभीर अनियमितता,निकृष्ट दर्जाचे काम,भ्रामक प्रगती अहवाल व प्रशासकीय निष्क्रियतेच्या निषेधार्थ तात्काळ चौकशी व कार्यवाही करावी,तसेच दिनांक २५ एप्रिल २०२६ पर्यंत पाणीपुरवठा योजना सुरू न झाल्यास दिनांक १ मे २०२६ रोजी जलसमाधी आंदोलन करण्याबाबत पूर्वसूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
मौजा शंकरपूर (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथे जल जीवन मिशन अंतर्गत अंदाजे रु. ७ कोटी खर्चाची ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती.सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येत आहे.
परंतु सदर योजनांतर्गत कामे सुरू होऊन तीन (३) वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असतानाही आजपर्यंत गावातील फक्त निवडक लोकांच्या घरी पाणी पोहोचले व बाकीच्या एकाही घरात प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
ही बाब शासनाच्या “हर घर नल – हर घर जल” या महत्वाकांक्षी योजनेच्या उद्देशालाच बाधा आणणारी असून ग्रामस्थांच्या मूलभूत हक्कांचे गंभीर उल्लंघन करणारी आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावरून तसेच उपसरपंच अशोक चौधरी यांच्या स्तरावरुन अनेक वेळा संबंधित विभागाकडे लेखी निवेदने व तक्रारी देण्यात आल्या आहेत.
तसेच दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाण्या च्या टाकीवर चढून शोले स्टाईल निषेध आंदोलन उपसरपंच अशोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
त्या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी “एका महिन्याच्या आत काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल” असे लेखी व तोंडी आश्वासन दिले होते.मात्र सदर आश्वासनाची आजतागायत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे.योजनेतील आढळून आलेल्या गंभीर अनियमितता
सदर पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत खालीलप्रमाणे गंभीर त्रुटी व अनियमितता आढळून येत आहेत…
१) मंजूर तांत्रिक मानके व अंदाजपत्रकाचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे.
२) गावातील मुख्य वितरण पाइपलाईन आवश्यक खोलीनुसार टाकण्यात आलेली नाही.
३) अनेक ठिकाणी पाइपलाईन उघडी पडलेली असून काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले आहे.
४) स्विच रूमचे बांधकाम अपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या दर्जाहीन आहे.
५) नव्याने बांधलेली ओव्हरहेड पाण्याची टाकी गळती अवस्थेत असून संरचनात्मक दोष दिसून येत आहेत.
६) गावातील रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदून ठेवलेले असून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, ज्यामुळे नागरिकांच्या जीवितास अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
७) प्रत्यक्ष काम अपूर्ण असतानाही संबंधित अधिकारी व कंत्राटदारांकडून भ्रामक व चुकीचे प्रगती अहवाल शासनास सादर करण्यात आल्याची गंभीर शंका आहे.
८) विभागीय देखरेखीचा पूर्ण अभाव असून अधिकारी व कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
प्रशासक उपसरपंच अशोक चौधरी यांच्या मते वरील सर्व बाबी या सार्वजनिक निधीचा संभाव्य अपव्यय,करारभंग,तांत्रिक मानकांचे उल्लंघन तसेच प्रशासकीय दुर्लक्ष दर्शविणाऱ्या आहेत.
ग्रामस्थांची गंभीर परिस्थिती…..
गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेसाठी आजही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासनाच्या “हर घर नल – हर घर जल” या योजनेचा उद्देश शंकरपूर गावात पूर्णपणे अपयशी ठरत आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी निर्माण झाली आहे.
प्रशासनास अंतिम इशारा….
सदर प्रकरणी वारंवार निवेदने, तक्रारी व पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
त्या अनुषंगाने प्रशासनास अंतिम इशारा निवेदनाद्वारे अशोक चौधरी यांच्या द्वारा देण्यात आला आहे की,दिनांक २५ एप्रिल २०२६ पर्यंत शंकरपूर येथील पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात सुरू करून गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला नाही,तर दिनांक १ मे २०२६ रोजी शंकरपूर येथील आठवडी बाजार परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीवर चढून “जलसमाधी आंदोलन” करण्यात येईल.
या आंदोलनाची ही पूर्वसूचना प्रशासनास देण्यात येत असून,या संदर्भात उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व प्रशासनावर राहील,याची कृपया नोंद घ्यावी असेही अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.
मागण्या….
१) सदर पाणीपुरवठा योजनेची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी तातडीने करण्यात यावी.
२) चौकशीअंती दोषी आढळलेल्या अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांविरुद्ध शिस्तभंगात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी.
३) शंकरपूर गावात पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी निश्चित कालमर्यादेसह ठोस कृती आराखडा जाहीर करण्यात यावा.
४) चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात यावे.
सदर निवेदनाकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी,अशी नम्र विनंती अशोक ज्ञानेश्वर चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत शंकरपूर ता.चिमूर,जि.चंद्रपूर,मो. ९७६५८६५२९८,यांनी केली आहे.



