दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर १२ मार्च – भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त समता दिन तसेच क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात महापौर संगीता खांडेकर व आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस समता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी महापौरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या घडणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून सामाजिक समता, प्रगतीशील विचार आणि लोकाभिमुख प्रशासनाची परंपरा त्यांनी रुजवली, असे त्यांनी नमूद केले.
तसेच क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाला एकत्र करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या शौर्य, देशभक्ती व बलिदानामुळे ते विदर्भातील स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यातून समाजात स्वाभिमान, धैर्य आणि देशप्रेमाची भावना जागृत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आयुक्तांनीही दोन्ही महान व्यक्तींच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्यातून समाजात समता, बंधुता व प्रगतीचा संदेश मिळत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी उपायुक्त शेषराव टाले, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सिद्दिक अहमद, गुरुदास नवले, माधवी दाणी, प्रवीण गुळघाणे, ग्रेस नगरकर, मनीषा नैताम तसेच महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



