दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांमध्ये शिवकालीन युद्धकलेचा समावेश करावा, अशी मागणी नगरसेविका रुपाली धाडवे व माजी नगरसेवक दिनेश धाडवे यांनी पुण्यनगरीच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे प्रतीक असलेल्या मर्दानी खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी, भाला यांसारख्या पारंपरिक युद्धकला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या महापौर चषक स्पर्धा शहरातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहेत. विविध पारंपरिक व आधुनिक क्रीडा प्रकारांमधून खेळाडूंना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. यामध्ये शिवकालीन युद्धकलेचा समावेश झाल्यास युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी जोडलेली मर्दानी खेळांची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या कलेला प्रोत्साहन मिळाल्यास तरुण पिढीला आपल्या इतिहासाशी जोडण्याची आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची ओळख करून देण्याची संधी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी या मागणीचे स्वागत करत विषय सकारात्मक असून आपल्या मागणीचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे भविष्यात महापौर चषक स्पर्धेला पारंपरिक क्रीडा आणि सांस्कृतिक वारशाचीही जोड मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



