Home उपक्रम स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत झोननिहाय क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न…

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत झोननिहाय क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न…

दिक्षा कऱ्हाडे 

  वृत्त संपादिका 

चंद्रपूर २६ फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिका येथे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अधिकारी, तांत्रिक कर्मचारी व सफाई मित्रांसाठी झोननिहाय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छता नॉलेज पार्टनर (SKP) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

          कचरा मुक्त शहरांसाठी राष्ट्रीय क्षमता बांधणी आराखड्याअंतर्गत राज्य, केंद्रशासित प्रदेश तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकाऱ्यांची क्षमता बळकट करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत २३ स्वच्छता नॉलेज पार्टनर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत स्वच्छता नॉलेज पार्टनर्सपैकी हिमालयन इन्स्टीट्यूट फॉर एन्व्हायर्न्मेंट,इकोलॉजी अँड डेव्हलपमेन्ट (HIFEED)या संस्थेमार्फत क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

             त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेत सफाई दरोगा, प्रभाग शिपाई, स्थायी व कंत्राटी सफाई कामगार यांच्यासाठी झोननिहाय प्रशिक्षणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात येऊन १६ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रशिक्षण हे कुशाग्र इनोव्हेशन फाऊंडेशन तर्फे ऑपरेशन एक्झीक्युटिव्ह आकाश गायकवाड यांनी दिले

           प्रशिक्षणामध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कार्यपद्धती, ओला-सुका कचरा वर्गीकरण, घराघरांतून कचरा संकलनातील सुधारणा, बारकोड स्कॅनिंग प्रणालीचा प्रभावी वापर, सुरक्षितता उपाययोजना, वैयक्तिक संरक्षक साधनांचा (PPE) वापर तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष कामातील अडचणी, तक्रार निवारण व्यवस्था व डिजिटल नोंदीकरण यावर प्रात्यक्षिकांसह चर्चा करण्यात आली.

           या उपक्रमामुळे स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम, सुरक्षित व परिणामकारक होण्यास मदत होणार असून स्वच्छ व कचरा मुक्त चंद्रपूरच्या उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार आहे.