Home Maharashtra ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये चंद्रपूरला विभागात ८ वे स्थान…

‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये चंद्रपूरला विभागात ८ वे स्थान…

दिक्षा कऱ्हाडे 

  वृत्त संपादिका 

चंद्रपूर २६ फेब्रुवारी : चंद्रपूर महानगरपालिका ला राज्य शासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रम माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या अमृत गटात विभागस्तरीय ८ वे स्थान प्राप्त झाले आहे. मागील वर्षी शहरास १२ वा क्रमांक मिळाला होता. यंदा पर्यावरणविषयक कामगिरीत सुधारणा करत चंद्रपूरने ८ वा क्रमांक पटकावला आहे.

           राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे ‘माझी वसुंधरा अभियान’ हे पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित आहे. शहरांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे आणि शाश्वत विकास साध्य करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

           या अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती अभियान, कचरा वर्गीकरण व पुनर्वापर, जलसंधारण, स्वच्छ ऊर्जा वापर प्रोत्साहन, हरित क्षेत्र वाढविणे तसेच नागरिक सहभागातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविले. या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत मनपेला विभागात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

           आयुक्तांनी या यशाबद्दल संबंधित अधिकारी-कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन करत पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. तसेच आगामी काळात अधिक परिणामकारक उपक्रम राबवून चंद्रपूरचा क्रमांक आणखी उंचावण्याचा मनपा प्रशासनाचा संकल्प असल्याचे नमूद केले.