राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
रस्ता सूरक्षा अभियाना अंतर्गत कूरखेडा पोलीस स्टेशनचा वतीने काल सायंकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रस्त्यावरून चालणाऱ्या मालवाहू चारचाकी वाहनांना थांबवत प्रत्येक वाहनावर मागील बाजूस चकाकणारे रेडीयम रिफ्लेक्टर बसविले.या उपक्रमामुळे रस्ते अपघातावर निश्चितच काही प्रमाणात आळा बसेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हात पोलीस दलाचा वतीने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पदभार संभाळताच जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी रस्ता सूरक्षा अभियान राबविण्यात भर दिला आहे.
या अंतर्गत वाहनांची वेगमर्यादा,सिटबेल्ट,हेल्मेट चा वापर,वाहन चालविताना मद्यपान टाळणे याकरीता जनजागृती व कार्यवाहीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.तसेच इतर पूरक उपक्रम राबवित अपघाताची शक्यता टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
काल सायंकाळी वाहनावर मागील बाजूस रेडीयम रिफ्लेक्टर बसविणे हा रस्ता सूरक्षा मोहीमेचाच एक भाग होता.सदर मोहीमेत ठाणेदार महेंद्र वाघ,साहायक पोलिस निरीक्षक प्रियंका आघाव,वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवराव सहारे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.



