Home Social खेळायला जागा द्या!’— वृंदावन कॉलनीतील चिमुकल्यांचा नगराध्यक्षांना भावनिक साद…

खेळायला जागा द्या!’— वृंदावन कॉलनीतील चिमुकल्यांचा नगराध्यक्षांना भावनिक साद…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : मोबाईलच्या पडद्याऐवजी मोकळ्या मैदानावर धावण्याची आस लागलेल्या वृंदावन कॉलनीतील बाळगोपाळांनी थेट नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांना निवेदन देत खेळाच्या मैदानाची मागणी केली आहे. “आम्हाला खेळायला जागा द्या” असा भावनिक सूर त्यांच्या अर्जातून उमटला आहे.

         वृंदावन कॉलनीमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र मैदान नसल्याने त्यांना रस्त्यावर खेळावे लागते. मात्र वाहनांची ये-जा आणि परिसरातील नागरिकांची मनाई यामुळे खेळाचा आनंद हिरावला जात असल्याची खंत मुलांनी व्यक्त केली आहे. कॉलनीतील मोकळी जागा सध्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जात असल्याने मुलांना खेळण्यासाठी जागाच उरत नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. “आम्हालाही धावायचंय, खेळायचंय, मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवायचाय,” असा साधा पण मनाला भिडणारा संदेश या अर्जातून देण्यात आला आहे. 

         रस्त्यावर खेळताना होणारा त्रास आणि मोकळ्या जागेवर वाहनांचे पार्किंग यामुळे बालपणच कोमेजत असल्याची वेदना त्यांनी मांडली होती. या साध्या पण थेट मांडणीने नगराध्यक्ष भारावून गेले. कुऱ्हाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत प्रशासकीय पातळीवर लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर अंतिम निर्णय होईपर्यंत स्वतःची मोकळी जागा मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला. नगराध्यक्षांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. “आम्हाला खेळायला जागा दिल्याबद्दल धन्यवाद,” असे म्हणत चिमुकल्यांनी त्यांचे आभार मानले.