भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील पवनी येथील महिला विश्रांती गृहाचे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दि. 14 फेब्रुवारी 2026 उदघाटन करण्यात आले.
पवनी, तोयागोंदी व मोहली या तीन गावांमध्ये महिलांसाठी मासिक पाळीदरम्यान सुरक्षित व सन्मानपूर्वक निवासासाठी उभारण्यात आलेल्या विश्रांतीगृहांच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम युवा परिवर्तन, Finolex, मुकुल माधव फाऊंडेशन व समस्त गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच मिलिंद नरोटे (आमदार, गडचिरोली) सुरेंद्रसिंग चंदेल शिवसेना प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अभिषेक राय (Finolex), यामिनी शेख (मुकुल माधव फाऊंडेशन), विलासजी कांबळे (माँ फाऊंडेशन), दर्शना सावंत (डायरेक्टर, युवा परिवर्तन), प्रशांत मंडावार (मॅनेजर, युवा परिवर्तन), तसेच Susten Plus कडून संजय सर व शुभम सर आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
युवा परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून धानोरा तालुक्यात आतापर्यंत एकूण २९ महिला विश्रांतीगृहांची निर्मिती करण्यात आली असून, या उपक्रमामुळे दुर्गम भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान सुरक्षित, स्वच्छ व सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश उईके यांनी केले, तर अनिकेत गुरनुले यांनी आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागात मासिक पाळी आरोग्याबाबत जागरूकता वाढीस लागून महिला सक्षमीकरणाला बळ मिळत असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.



