रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी…
लोहारडोंगरी परिसरात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.या प्रकल्पामुळे शेती,पाणीस्त्रोत,वन्यजीव आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होणार असल्याचा आरोप अँड.नारायण जांभुळे यांनी चिमूर येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केला आहे.
ग्रामसभेत ठराव घेऊन प्रकल्पाला स्पष्ट नकार देण्यात येणार आहे.प्रकल्पासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता हालचाली सुरू करण्यात आल्याचा आरोप होत असून,स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोहार डोंगरी हे शेतीप्रधान गाव असून,येथील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.प्रकल्पामुळे सुपीक जमिनी नष्ट होतील,तसेच भूजल पातळीवर विपरित परिणाम होईल,अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव मंजूर केला.प्रशासनाने ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रकल्प पुढे रेटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जांभुळे यांनी दिला आहे.
दरम्यान,प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्पासंदर्भात पारदर्शक भूमिका घ्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.



