Home Maharashtra इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी ठोस कृती आराखडा आवश्यक :-  नगराध्यक्ष कुऱ्हाडे… — आळंदी...

इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी ठोस कृती आराखडा आवश्यक :-  नगराध्यक्ष कुऱ्हाडे… — आळंदी नगरपरिषदेची इंद्रायणी संदर्भात विशेष सभा…

दिनेश कुऱ्हाडे 

  वृत्त संपादिका 

आळंदी : इंद्रायणी नदीचा प्रश्न हा आळंदीकरांच्या श्रद्धा, परंपरा व दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेला असून, नदी स्वच्छतेसाठी तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन व शाश्वत आराखडा राबविणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य शासनाकडे सातत्याने ठोस पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका नगराध्यक्ष प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी मांडली. इंद्रायणीतील वाढते प्रदूषण ही गंभीर बाब असून, प्रशासनासह लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सामूहिक सहभागातूनच नदीला पुन्हा निर्मळ स्वरूप प्राप्त करून देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

         इंद्रायणी नदी स्वच्छ, निर्मळ व प्रदूषणमुक्त राखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने आळंदी नगरपरिषदेची विशेष सभा मंगळवारी नगरपरिषद सभागृहात पार पडली. या सभेला आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे व विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील उपस्थित होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह एकूण २० नगरसेवक व नगरसेविका सभेला उपस्थित होते. यावेळी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. भावार्थ देखणे यांचा नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

          सभेत “आळंदी येथील इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत विविध उपाययोजना” या विषयावर सविस्तर चर्चा झाली. नगरसेविका पूजा घुंडरे यांनी नदी घाटावर महिलांसाठी चेंजिंग रूमची सुविधा, सुरक्षा रक्षकांची नेमणूक तसेच कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली. नगरसेवक हेमंत कुऱ्हाडे यांनी औद्योगिक सांडपाण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची सूचना केली. शहरातील एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवून कुंड स्वच्छतेवर भर देण्याची भूमिका नगरसेविका वैजयंता उमरगेकर, नगरसेवक सुरेश झोंबाडे व सोमनाथ कुऱ्हाडे यांनी मांडली.

        विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे यांनी फुलविक्रेत्यांवर नियंत्रण, जलपर्णी निर्मूलन तसेच अस्थी विसर्जन व दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडला. नगरसेविका ऋतुजा घुंडरे यांनी आठवड्यातून एकदा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संयुक्त श्रमदानाची सूचना केली. गटनेते सचिन गिलबिले यांनी घाटावरील सुरक्षितता, पूर्णवेळ सफाई कर्मचारी व सर्व ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारण्याची गरज अधोरेखित केली.

         मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा सादर करत नागरिक व देवस्थानने स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी नगरपरिषदेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सर्व घटकांच्या समन्वयातूनच इंद्रायणी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे शक्य होईल, असा निष्कर्ष सभेत काढण्यात आला.