चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी :- बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखनी येथे संस्थेच्या प्राचार्या प्रणाली दहाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रणाली दहाटे मॅडम उपस्थित होत्या.
तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनीचे निरीक्षक म्हणून समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, लाखनी येथील एन.एन.कारवट, आर.आर.पटले व राजू भुरे यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला, विज्ञान व तंत्रज्ञानाचे जनक विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली. यावेळी निरीक्षक आर. आर. पटले यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रप्रदर्शनीचा उद्देश, प्रशिक्षणार्थ्यांमधील सृजनशीलता व नवकल्पनांचे महत्त्व विशद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रणाली दहाटे यांनी “तंत्र म्हणजे अवघड काम सोप्या पद्धतीने करण्याची कला असून आधुनिक काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावणे अत्यंत आवश्यक आहे,” असे सांगितले. त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संशोधनाचे उदाहरण देत तंत्रज्ञानाचे समाजविकासातील महत्त्व अधोरेखित केले.
या तंत्रप्रदर्शनीत इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, आयसीटीएसएम, वेल्डर, फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजी व कोपा या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण मॉडेल्स सादर करून आपली कौशल्ये प्रदर्शित केली. प्रशिक्षणार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक राजू भुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी निदेशक चक्रधर पाखमोडे यांनी पार पाडली.
या तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनी कार्यक्रमात बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखनी, गुरुकुल खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखनी, विश्वकर्मा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखनी तसेच धनंजय तिरपुडे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखनी येथील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक दिगंबर उरकुडे, शुभम व्यवहारे, शुभम सरकाटे, महेश शिंदे, मोहनजी रहाटे, नागेश बहिरे, हेमंत पिल्लेवान, नितेश सतदेवे, ईश्वरी भिवगडे, अर्चना जगाडे व सीमा सतदेवे यांनी विशेष सहकार्य केले.



