ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन सन 2025-26 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 06 जानेवारी 2026 रोजी शासकीय रोपवाटिका, सोनापूर, गडचिरोली येथे संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्रीमती प्रिती हिरळकर होत्या. मार्गदर्शन करताना महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गणेश दुरंदे, तंत्र अधिकारी (विस्तार) यांनी योजनेची अंमलबजावणी, उद्दिष्टे व क्षेत्रीय कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील विषय विशेषज्ञ प्रीतम चिरडे यांनी रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान या विषयावर सखोल व प्रात्यक्षिकासह माहिती दिली. ज्वारी पिकाचे सुधारित वाण, लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यातील प्रकल्प उपसंचालक रवींद्र हरणे व सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
या प्रशिक्षणामुळे मिलेट मिशन अंतर्गत रब्बी ज्वारी क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढीस निश्चितच चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



