Home Maharashtra आळंदी नगरपरिषदेच्या नियोजित इमारतीत पत्रकार कक्षाला जागा, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचे आश्वासन…...

आळंदी नगरपरिषदेच्या नियोजित इमारतीत पत्रकार कक्षाला जागा, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचे आश्वासन… — आळंदी नगरपरिषदेत मराठी पत्रकार दिन साजरा…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी : “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी समाजातील प्रश्न, अडचणी व विकासात्मक मुद्दे सातत्याने मांडले आहेत. आळंदीच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी शहरातील स्थानिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. 

             पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक सचिन गिलबिले, आदित्य घुंडरे, दिनेश घुले, सोमनाथ कुऱ्हाडे, सुरेश झोंबाडे, सागर कुऱ्हाडे, सुनिल घुंडरे, गोविंद कुऱ्हाडे, नगरसेविका सुजाता तापकीर, खुशी बोरुंदीया, साक्षी कुऱ्हाडे, ऋतुजा घुंडरे, उज्वला काळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

            कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, आळंदी नगरपरिषदेच्या प्रस्तावित व नियोजित इमारतीत स्वतंत्र पत्रकार कक्ष उभारण्यात येणार आहे. या कक्षामधून पत्रकारांना कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

             मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हटले की “पत्रकार हे समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. आळंदीच्या विकासात्मक कामांबाबत पारदर्शक व सकारात्मक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य कायम लाभत राहील, असा विश्वास आहे असे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. आळंदी शहराच्या विकासासाठी सकारात्मक पत्रकारिता करताना नगरपरिषदेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत पत्रकारांनी व्यक्त केले.