ऋग्वेद येवले
उपसंपादक
साकोली :- वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, साकोली येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व महान समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत सन्मानपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. जितेंद्र कुमार ठाकुर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनविले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवत समाजात समता, न्याय व मानवतेच्या मूल्यांची पायाभरणी केली. सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही तरुण पिढीला जागरूक, संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ नागरिक बनण्याची प्रेरणा देतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष व कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की, भारतीय शिक्षण व्यवस्था व महिला सशक्तीकरणाच्या इतिहासात त्यांचे योगदान सदैव स्मरणीय राहील.
या कार्यक्रमास प्रा.नीरज अधिकारी, डॉ.रामकुमार, अशोक कुमार मीणा, डॉ. पुखराज लांजेवर, सैयद शाहिद यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याच्या संकल्पाने करण्यात आला.



