प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका लढविल्या होत्या.या निवडणूकी अंतर्गत पक्षाचे ०६ उमेदवार निवडून आले असल्याने,सहा पक्ष उमेदवारांचा विजय हा,पक्ष पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास परत नव्याने जागविणारा ठरला आहे.
बहुजन समाज पार्टीने यापुर्वी महाराष्ट्र राज्यात दबदबा निर्माण केला होता आणि बऱ्याच ठिकाणी नगरसेवक,जि.प.सदस्य व प.स.सदस्य निवडून आणले होते.
याचबरोबर बहुजन समाज पार्टीला सर्व समाजातील मानणारा वर्ग होता.महिलांच्या-पुरुषांचा,युवक-युवतीचा,विद्यार्थ्यांचा बहुजन समाज पार्टीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता मनुवादी विचारसरणीच्या पक्षांचे देशासह महाराष्ट्र राज्यात धाबे दणाणले होते.
बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.सुनील डोंगरे हे परत महाराष्ट्र राज्यात बहुजन समाज पार्टीची ताकद वाढविण्यासाठी कामाला लागले आहेत.
मान्यवर कांशीरामजी यांच्या हयातीत तनमनधनातंर्गत पक्ष पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते स्वतःला पक्षासाठी वाहून घेत होते.त्याच पध्दतीने परत कार्यकर्ता वर्ग महाराष्ट्र राज्यात उभा करणे आवश्यक आहे.
बहुजन समाज पक्ष हा भारतातील एक प्रगतीशील राजकीय पक्ष आहे जो बहुजनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता.
जो देशातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्ग (ओबीसी) तसेच अल्पसंख्याकांना सूचित करतो.कांशीरामजी यांच्या मते , जेव्हा त्यांनी १९८४ मध्ये पक्षाची स्थापना केली तेव्हा बहुजनांमध्ये भारताच्या लोकसंख्येच्या ८५ टक्के लोक होते,परंतु ते ६,००० वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेले होते.
बसपा पक्ष राष्ट्र निर्माता डाॅ.बी.आर.आंबेडकर,महात्मा ज्योतिराव फुले,नारायण गुरु, छत्रपती शाहूजी महाराज आणि गौतम बुद्ध आणि बहुजन समाजातील संत-महापुरुष यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित असल्याचा दावा करतो.
बहुजन समाज पक्ष हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे.हा आंबेडकरवादी,समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे.हा पक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजन समाज हिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो.
इ.स. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना झाली.इ.स. २००३ सालापासून बहन मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत.हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे.
इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकींत या पक्षाने २१ जागा जिंकल्या.त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता.राष्ट्रीय पक्ष म्हणून भारत देशात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.
देशात अनेक राजकीय पक्ष आहेत,जे निवडणुका जवळ आल्या की त्यांना आंबेडकरी समाज आठवतो.मात्र सत्तास्थानी बसल्यानंतर त्यांच्या द्वारे संविधानाच्या विरोधात कारभार केला जातो.
मात्र,बहुजन समाज पार्टी देशात भारतीय संविधानानुसार आणि महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे..
म्हणूनच बसपा परत महाराष्ट्र राज्यात दम दाखवेल काय? हा प्रश्न पुढे येतो आहे.बसपा सारख्या पक्षाची या देशाला व या देशातील नागरिकांना काळाची गरज आहे हे वास्तव आहे.



