दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला मोठा राजकीय धक्का दिला आहे. भाजपच्या फायरब्रँड नगरसेविका सीमा साळवे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
याच कार्यक्रमात इंद्रायणीनगर प्रभागातून मागील निवडणुकीत शिवसेनेकडून ७५५० हून अधिक मताधिक्य मिळवणारे युवा नेते तुषार सहाणे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील निवडणुकीत या प्रभागातून एकमेव नगरसेवक निवडून आला होता. मात्र, सध्याच्या पक्षप्रवेशांमुळे आगामी निवडणुकीत भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, प्रचार प्रमुख नाना काटे, अजित गव्हाणे, संजय वाबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने पक्षात दाखल झालेल्या नेत्यांचे स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस आगामी महापालिका निवडणुकीत अधिक ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या पक्षप्रवेशांमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पुढील काळात आणखी हालचाली वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.



