दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे आदित्य घुंडरे आणि ऋतुजा घुंडरे यांचा विकासाभिमुख प्रचार वेग घेत असून परिसरात त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील प्राथमिक सोयी-सुविधांची उभारणी, रस्त्यांचे सुशोभीकरण, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या महत्वाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १चे उमेदवार आदित्य घुंडरे व ऋतुजा घुंडरे हे दाम्पत्य मतदारांपर्यंत पोहोचत आहे.
घराघरांत जाऊन संवाद साधणे, स्थानिक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करणे आणि त्यावर त्वरित उपाययोजना सुचवणे या माध्यमातून दोघांनीही प्रभागातील नागरिकांचा विश्वास जिंकण्यास सुरुवात केली आहे. नवमतदारांशी विशेष संवाद साधत आधुनिक आळंदीच्या संकल्पनेची मांडणीही ते प्रभावीपणे करत आहेत.
अलीकडच्या काळात प्रभागातील वाढती लोकसंख्या, रस्त्यांवरील ताण, पावसाळ्यातील ड्रेनेज समस्यांमुळे नागरिक त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर “विकास हा प्राधान्य” या भूमिकेतून केलेली मांडणी मतदारांना भावत असल्याचे चित्र दिसत आहे.
आदित्य घुंडरे यांची संघटनात्मक बाजू प्रभागात मजबूत असून कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत जनसंपर्क मोहीम अधिक जोमात सुरू केली आहे. आदित्य व ऋतुजा घुंडरे यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक १ मधील निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होणार, अशी चिन्हे दिसून येत आहेत.



