Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ३ मध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात; भाजप...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ३ मध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात; भाजप उमेदवारांनी साधला नागरिकांशी संवाद…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी वाढत असताना प्रभाग क्रमांक ३मध्ये भाजपच्या प्रचारफेरीला नागरिकांनी दिलेला जोरदार प्रतिसाद हा विकासाभिमुख राजकारणाला मिळालेला विश्वास मानला जात आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे व प्रभाग क्रमांक ३चे उमेदवार सोमनाथ कुऱ्हाडे व पुजा घुंडरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रचारमोहीमेने प्रभागात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं.

        भाजपचे उमेदवार सोमनाथ कुऱ्हाडे आणि पुजा संजय घुंडरे यांनी या फेरीदरम्यान प्रभागासाठीचा ‘विकास आराखडा’ नागरिकांसमोर स्पष्टपणे मांडला. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सुशोभिकरण, उद्याने, पथदिवे, डिजिटल सुविधा आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही नेटवर्क असा सर्वसमावेशक विकास योजनेचा आराखडा त्यांनी मांडला.

         नागरिकांनीही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. विशेषतः काही अंतर्गत रस्ते, नाली व्यवस्था, नियमित कचरा उपसणे आणि वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या मागण्या ठळकपणे पुढे आल्या.

सोमनाथ कुंडलिक कुऱ्हाडे यांचे मनोगत…

        “प्रभाग ३चा सर्वांगीण विकास हा माझा एकमेव ध्यास आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कामांना गती मिळाली असली तरी अजून बरीच कामे करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात नियमित आणि स्वच्छ पाणी पोहचणे, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट करणे, नाल्या आणि कचरा व्यवस्थापनाचे वैज्ञानिक नियोजन करणे, तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे — या सर्व गोष्टींसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मतदारांनी दिलेला आजचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे.”

पुजा संजय घुंडरे यांचे मनोगत

         “नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरणारा विकास हा आमच्या टीमचा मुख्य उद्देश आहे. महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छता मोहिमा, आरोग्य तपासणी कॅम्प, बालकांसाठी उद्याने, महिलांसाठी स्वयंसहाय्य गटांना आर्थिक चालना — या सर्व गोष्टींबाबत मी विशेष लक्ष देईन. प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार नियोजनबद्ध प्रकल्प राबवणार आहे. विकासाचा वेग आणि पारदर्शक प्रशासन — यावरच आमची ओळख निर्माण होईल.”

          नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांनीही प्रभाग ३ साठी मोठ्या पायाभूत कामांची हमी दिल्याने या प्रभागात भाजपचा विकास अजेंडा अधिक ठळकपणे समोर आला आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे प्रभाग क्रमांक ३मध्ये प्रचार आणखी गतीमान होण्याचे संकेत मिळत आहेत.