अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
अमरावती :- शहरातील बंद दुकाने लक्ष्य करून शटर वाकवून आत प्रवेश करणाऱ्या अट्टल दुकानफोडी गुन्हेगाराला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तब्बल सहा दुकानफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, २,४०,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी अतर हुसेन अहमद हुसेन (४०), रा. पाटीपूरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टिपू सुलतान मार्केटमधील ‘लजीज’ हॉटेल चे शटर अज्ञात चोरट्याने वाकवून आत प्रवेश केला आणि टॅब तसेच रोख रक्कम चोरून नेली.या प्रकरणी पो.स्टे. गाडगेनगर येथे कलम ३०५(अ), ३३१ भा.दं.वि. नुसार १२ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘राजा चोर’ ताब्यात…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनीष वाकोडे हे तपास करीत असताना, गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार ‘राजा चोर’ (शेख राजा शेख बाबा) हा गुन्ह्याचा कारभार करत आहे.
त्यानुसार १५/११/२०२५ रोजी डिप्टी मैदान परिसरातून, आरोपीला अॅटोसह ताब्यात घेण्यात आले. त्याने आपले नाव शेख राजा शेख बाबा (२१), मूळ रा. अन्सार नगर, पाण्याच्या टाकीजवळ, पो.स्टे. नागपूरी गेट, सध्या यासीन प्लॉट, बडा ताजबाग, पो.स्टे. सक्करदरा (नागपूर) असे सांगितले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी रात्रीच्या वेळी अमरावती–बडनेरा मार्गावर ॲटो चालवत दुकानफोडी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरीतून मिळालेल्या पैशांनी त्याने ॲटो व ॲक्टीव्हा खरेदी केल्याची कबुलीही दिली.
कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपआयुक्त रमेश धुमाळ (मुख्यालय), गणेश शिंदे (परिमंडळ 1), श्याम घुगे (परिमंडळ 2), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सपोनि मनीष वाकोडे, फिरोज खान, सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, सैयद नाझीम, रणजीत गावंडे, चालक प्रभात पोकळे यांचा समावेश होता.
