अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्यूज भारत..
अमरावती :- अमरावती जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधातील मोहीमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा,अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
ओडिशा राज्यातून गांजा तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून तब्बल १०४ किलो ८७९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
या अंमली पदार्थाची किंमत तब्बल २० लाख ६६ हजार ९६० रुपये असून,गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहनासह एकूण २६ लाख १६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अटकेतील आरोपींची नावे रवी रामराव राठोड (वय ३६, रा. भिवापुर (कु), ता. तिवसा) आणि आकाश गौतम भडके (वय ३२, रा. वाई बोथ,ता.नांदगाव खंडेश्वर) अशी आहेत.
या कारवाई संदर्भात अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर पाऊले उचलण्याचे आदेश संबंधित शाखांना दिले होते.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर आपल्या पथकासह तिवसा हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की काही व्यक्ती नागपूरहून अमरावतीकडे बोलेरो वाहनातून गांजा वाहतूक करत आहेत.
त्यानुसार पोलिसांनी मोझरी-दासटेकडी ते डवरगाव उड्डाणपुलाखाली नाकाबंदी केली.काही वेळात एक विनाक्रमांक सिल्वर रंगाचे बोलेरो वाहन पोलिसांच्या नजरेत आले.ते थांबवून तपासणी केली असता चालक रवी राठोड आणि सोबतीचा प्रवासी आकाश भडके यांनी संशयास्पद उत्तरं दिली.
वाहनाची तपासणी केल्यावर पोलिसांना दोन नंबर प्लेट (एमएच-१७ एजे-२२८३ आणि सीजी-१० एबी-२८४९) मिळाल्या.सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की वाहनात गुप्त कप्प्यांमध्ये गांजा लपवला आहे.
वाहनाच्या मागील टेललाइटच्या आत,चालक आणि कंडक्टर साइडच्या पायदानाखालील चेंबरमध्ये, तसेच वाहनाच्या तळाशी तयार करण्यात आलेल्या कप्प्यात ५३ पॅकेट्समध्ये गुंडाळलेला गांजा आढळला.
वजन १०४ किलो ८७९ ग्रॅम आणि किंमत २० लाख ६६ हजार ९६० रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर प्रकरणी पोलीस ठाणे तिवसा येथे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करून बोलेरो वाहनासह सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर,सागर हटवार, अमोल देशमुख, बळवंत दाभणे,भुषण पेठे,सुधीर बावणे,मंगेश लकडे,सचिन मसांगे,पंकज फाटे,दिनेश कनोजीया,अरविंद गांवडे,महेश काळे,तसेच सायबर पो.स्टे.चे अधिकारी सहभागी होते.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भापोसे) आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


