Home Political “आदर्श आळंदी” घडविण्याचा निर्धार – समाजसेवक/उद्योजक सतिश चोरडिया नगराध्यक्षपदासाठी उत्सुक…

“आदर्श आळंदी” घडविण्याचा निर्धार – समाजसेवक/उद्योजक सतिश चोरडिया नगराध्यक्षपदासाठी उत्सुक…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र नगरीला “आदर्श आळंदी” बनविण्याचा निर्धार व्यक्त करत शहरातील प्रसिद्ध समाजसेवक/उद्योजक सतिश चोरडिया यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उत्सुकता दर्शविली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आत्याधुनिक सुविधा, स्वच्छता आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन ही त्यांची प्रमुख ध्येये आहेत.

        सतिश चोरडिया हे आळंदीतील नावाजलेले समाजसेवक / उद्योजक असून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. शहरातील विविध विकास कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांमध्ये विश्वासार्ह आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

         “संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नगरीला आत्याधुनिक सुविधांनी सजविणे, हे माझे ध्येय आहे. स्वच्छ आळंदी, शुद्ध पिण्याचे पाणी, इंद्रायणी नदी स्वच्छता, वारकऱ्यांसाठी दर्जेदार सुविधा, वाहतूक सुलभता, स्मार्ट सेवा आणि पर्यटन विकास या सर्व आघाड्यांवर नियोजनबद्ध काम करणार आहे,” असे चोरडिया यांनी सांगितले.

         ते पुढे म्हणाले, “शहरातील नागरिकांसोबत राहून पारदर्शक प्रशासन देणे आणि सर्व निर्णयांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे, हा माझा प्रयत्न असेल. वाढती लोकसंख्या, अपुरी सुविधा आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता शहरासाठी दीर्घकालीन विकास आराखडा आवश्यक आहे. यात पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, डिजिटल सेवा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश असेल.”

          “आळंदीचा विकास हा केवळ राजकारणाचा विषय नसून श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटनाच्या माध्यमातून शहराला एक नवीन ओळख देण्याचा संकल्प आहे. माऊलींच्या नगरीला ‘आदर्श आळंदी’ म्हणून उभारण्यासाठी आम्ही सर्वांच्या सहकार्याने काम करणार आहोत,” असे चोरडिया शेवटी म्हणाले.