शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
ओबीसी समाज घटकांचे आरक्षण जैसे थे रहावे यासाठी पायगाव येथील सरपंच मंगेश साबळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.त्यांच्या सर्व मागण्यांचा महाराष्ट्र सरकारने तातडीने विचार करावा या अपेक्षासह चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपुर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
याचबरोबर त्यांनी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,आपल्या शासनाकडून आजवर शेतकरी,कामगार व सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले आहेत,याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.परंतु सद्यपरिस्थितीत काही गंभीर प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.
गेवराई तालुक्यातील पायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत.
त्यांच्या मागण्या शेतकरी,ग्रामीण जनता व जनहिताच्या दृष्टीने पूर्णपणे न्याय्य आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेत.असे असूनही,आठ दिवस उलटून गेले तरी शासन वा प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही,ही बाब अत्यंत गंभीर,दुर्दैवी आणि शासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असेही उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.
म्हणूनच त्यांची मागणी आहे की,शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व उपोषणाची समाप्ती व्हावी.अन्यथा,आम्ही देखील त्यांच्या पाठिंब्यात तीव्र आंदोलन छेडण्यास वाध्य होऊ,याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या परिणामांसाठी संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असेही सुचित केले आहे.तद्वतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्याल आणि तात्काळ योग्य ती कारवाई कराल,अशी अपेक्षा उपसरपंच अशोक चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
मागण्या खालील प्रमाणे…
1. ओला दुष्काळ जाहीर करुन प्रति एकर ₹ 50,000 मदत देणे.
2. शेतातील माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 1,00,000 मदत.
3. जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर ₹ 50,000 मदत.
4. रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करणे,
5. शिक्षणासाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफी करणे,
6. विहिरींच्या बाबतीत – घराच्या पुराच्या पाण्यामध्ये पडझड झालेली विहिरी असतील त्यांना नवीन विहिरींची सोय करणे,
7. गरीब व श्रीमंत या निकष न वापरता समानतेने मदत प्रदान करणे.
8. जनावरे व शेतकऱ्यांना तात्काळ चारा छावण्या सुरू करणे.
9. ज्यांचे बँकेतील खाते “होल्ड” आहे ते खाते तात्काळ सुटवण्याची मागणी.
10. गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा उदाहरणार्थ, “जलजीवन मिशन” अंतर्गत कामे होऊन पाणी पुरवठा व्हावा.
11. घरकुल मिळणे – गावाने पूर्णपणे कर भरा असूनही घरकुल मिळत नसल्याचा प्रश्न यंत्रणांपुढे मांडलेला आहे.
सदर निवेदन चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना. श्री.अशोकजी उईके,जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सुध्दा देण्यात आले आहे.



