दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पंढरपूर – आषाढी शुद्ध एकादशी (०६ जुलै २०२५) निमित्त लाखो वारकरी पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. या पवित्र आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियंत्रण यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी दिली.
वारीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल ८ हजार ११७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात १ पोलीस अधीक्षक, ४ अप्पर पोलीस अधीक्षक, २४ पोलीस उपअधीक्षक, ७६ निरीक्षक, तसेच ३१२ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, ४८५० पोलीस अंमलदार आणि २८५० होमगार्डस यांचा समावेश आहे. शिवाय ५ एसआरपीएफ कंपन्या, ७ बीडीएस पथके, ४ क्युआरटी पथके, २ आरसीपी पथके आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी १४ विशेष CART पथके देखील सज्ज आहेत. जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १० ठिकाणी संयुक्त पथके जलसंपदा विभागाच्या सहकार्याने उभारण्यात आली आहेत.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील नदीपात्र, ६५ एकर, महाद्वार, घाट, पत्राशेड या महत्वाच्या ठिकाणी १२ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. चोरी आणि अन्य गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘माऊली स्कॉड’ स्थापन करण्यात आली असून, पोलिसच वारकरी वेषात गस्त घालणार आहेत. ३०० सीसीटीव्ही कॅमेरे शहरभर कार्यरत ठेवण्यात आले आहेत. भाविकांसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट, अंबाबाई पटांगण यासारख्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे वारंवार सूचना दिल्या जाणार आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात १४ डायव्हर्शन पॉईंट्स सुरू करण्यात आले असून, जड वाहनांना शहराबाहेरून वळविण्यात आले आहे. भाविकांच्या खाजगी वाहनांसाठी शहर व उपनगरात १७ वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारी शांततेत व सुरक्षित पार पडावी, यासाठी भाविकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.



