दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी परिसरात एका भरधाव चारचाकी वाहनाचा अपघात होऊन ६३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले असून, अपघाताचे कारण चालकाची हयगय आणि अविचारपूर्ण वाहन चालविणे असल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास हा अपघात तनिष्क सृष्टी सोसायटीजवळ घडला. या अपघातात गिरिजादेवी राधेश्याम रावत (वय ६३) या महिलेला आपले प्राण गमवावे लागले.
या प्रकरणी सत्यप्रकाश राधेश्याम गुप्ता (वय ६३, रा. जयपूर, राजस्थान) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमर राम जाधव (वय ३१) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री फिर्यादी, त्यांच्या नातेवाईकांसह गिरिजादेवी रावत या चारचाकी वाहनातून प्रवास करत होत्या. दरम्यान, चालक अमर जाधव याने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवल्याने वाहन रस्त्यावर पलटी झाले. अपघातात गिरिजादेवी गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडल्या, तर इतर प्रवासी आणि चालक जखमी झाले आहेत.



