दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पंढरपूर वारीच्या पवित्र काळात एक संतापजनक घटना समोर आली आहे. ३० जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. चहा पिण्यासाठी थांबलेल्या या भाविकांवर दोन दुचाकीस्वारांनी अचानक मिरचीपूड फेकून पळ काढला. या अनपेक्षित घटनेने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तातडीने सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
वारी ही महाराष्ट्राची ओळख :- डॉ. गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सामाजिक ओळख आहे. अशा पवित्र प्रवासात भाविकांवर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.”
त्यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी पुढील उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे…
१)महामार्गांवरील पोलीस गस्त वाढविणे.
२)भाविकांच्या मार्गावरील सुरक्षेची पुनर्रचना.
३)विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करणे.
४)महिला भाविकांसाठी स्वतंत्र गस्ती गाड्या सुरू करणे.
सरकारने सुरक्षेबाबत अधिक दक्षता घ्यावी :- गोऱ्हेंचा आग्रह…
वारीच्या काळात लाखो भाविक पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ढिलाई न करता शासनाने अधिक जागरूक राहावे, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे वारकरी संप्रदायात चिंता निर्माण झाली असून, भाविकांनी शासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.



