दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पंढरपूर — आषाढी एकादशीला अवघे दहा दिवस शिल्लक असताना, सावळ्या विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ पंढरीकडे वाढू लागला आहे. आठवडाभरात विविध संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होणार असून, त्यांच्यासोबत हजारो भाविक पंढरीत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
भाविकांना तात्काळ आणि अखंड दर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. शुक्रवार, २७ जूनपासून ही व्यवस्था सुरू झाली असून, पुढील वीस दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत मंदिर २४ तास खुले राहणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यांनी पहाटे विठ्ठलाचे विधीवत पूजन करून, पारंपरिक पद्धतीने देवाचा पलंग काढला आणि लोड दिला. यानंतर भाविकांसाठी २४ तास दर्शन खुले करण्यात आले.
वारकरी आणि भाविक दरवर्षी आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहत असतात. या काळात विठोबाचे नवरात्र बसते, असेही मानले जाते. त्यामुळे नित्योपचार वगळता इतर सर्व राजोपचार बंद ठेवले जातात, ज्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येते. पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे नियोजन कौतुकास्पद आहे. सुरक्षितता, स्वच्छता आणि दर्शन व्यवस्थेवर भर देत वारकऱ्यांचा वारीतील अनुभव अधिक भक्तिमय आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



