Home Social हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संगम,पाडेगाव येथील दर्गाहमध्ये वारकऱ्यांचे स्वागत…

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संगम,पाडेगाव येथील दर्गाहमध्ये वारकऱ्यांचे स्वागत…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पाडेगाव — श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याच्या सीमा ओलांडताच खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे असलेल्या हजरत पठाणशाह बाबा दर्गाहमध्ये पालखीचे आगमन झाले आणि एकात्मतेचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला.

       राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, तसेच पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अँड.राजेंद्र उमाप आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दर्गाहमध्ये येऊन हजरत पठाणशाह बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला.

       गेल्या अनेक वर्षांपासून हजरत पठाणशाह बाबा दर्गाह ट्रस्ट हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. दर्गाह ट्रस्टकडून माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी निवाऱ्याची व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दोन दिवसांपासून अनेक वारकरी दर्गाहमध्ये विश्रांती घेत होते आणि तिथून पुढे पालखी सोबत पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले.

       या ऐतिहासिक व मानवतेच्या प्रतीक असलेल्या उपक्रमाचे ना.मकरंद पाटील व पालखी सोहळा प्रमुखांनी विशेष कौतुक केले. ट्रस्टचे अध्यक्ष मुस्तफा आतार यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. “दर्गाहमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सन्मानाने सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो,” असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यात पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खास स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्याला निरोप देत माऊलींची पालखी भक्तिभावाने आणि एकतेच्या वातावरणात साताऱ्यात दाखल झाली.