दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे :- सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधत समाज कल्याण कार्यालय व श्री शाहू मंदीर महाविद्यालय,पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात संविधान जनजागृती प्रभातफेरी आणि समता दिंडीचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रभातफेरीची सुरुवात राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज,अनुराग सोसायटी,शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत येथून झाली.समता आणि संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करत प्रभातफेरी श्री.शाहू मंदीर महाविद्यालय,पर्वती पायथा येथे समारोपास आली.
या प्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव जागृत करण्यात आली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापकवर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,समाजकल्याण विभागाचे वसतिगृह प्रमुख व कर्मचारी,तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी सांगितले की, “समाजात समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांची रुजवण करण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची गरज आहे.”


