दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
सातारा : टाळ-मृदंगाच्या गजरात, फडफडणाऱ्या भगव्या पताका आणि हरिनामाच्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल्याने वातावरण एकदम पावन आणि पवित्र झाले होते.
पालखीच्या आगमनानिमित्त जिल्हा प्रशासन आणि मान्यवरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, तसेच वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला.
नीरा नदीतील पवित्र स्नानानंतर माऊलींच्या पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाने विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. खंडाळा व फलटण पंचायत समितीने प्रत्येक गावातील सेवा-सुविधांची माहिती देणारा क्यूआर कोड प्रथमच तयार केला आहे.
या माध्यमातून मुक्काम, पिण्याचे पाणी, शौचालये, महिला स्नानगृहे, आरोग्य सेवा, निवास, पेट्रोल पंप व संपर्क क्रमांक यांची माहिती सहज मिळू शकते. या उपक्रमाचे वारकऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी पाण्याचे टँकर, आरोग्य केंद्रे, स्वच्छतागृहे आणि चोख पोलिस बंदोबस्ताचीही प्रभावी व्यवस्था केली आहे, ज्यामुळे पालखी मार्गावर कोणतीही अडचण निर्माण न होता शिस्तबद्धतेने सोहळा पार पडत आहे.


