Home Maharashtra आळंदीतील लाईट बिल गोंधळावरून नागरिक संतप्त;शिवसेनेकडून महावितरणला तिव्र इशारा…

आळंदीतील लाईट बिल गोंधळावरून नागरिक संतप्त;शिवसेनेकडून महावितरणला तिव्र इशारा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- आळंदी शहरातील नागरिकांना महावितरणच्या अनियमित वीजबिल वितरण प्रणालीमुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर रीडिंग न घेता अंदाजे व अत्याधिक रकमेची बिले पाठवली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने महावितरण चाकण कार्यालयास तीव्र शब्दांत निवेदन दिले.

       शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात वीजबिल वितरणातील अनागोंदी, चुकीचे रीडिंग व त्यानुसार येणाऱ्या बोगस बिलांमुळे नागरिक त्रस्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी‌ शाखाप्रमुख रोहिदास कदम, विनायक महामुनी, विशाल तापकीर, अर्जुन मेदनकर हे उपस्थित होते.

       राहुल चव्हाण यांनी सांगितले, “आळंदी परिसरातील शेकडो नागरिकांनी शिवसेना कार्यालयात येऊन महावितरणविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. महावितरणने या तक्रारी गांभीर्याने घेऊन तात्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना देत आहे.”

निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत…

१)वीजबिल वाटपाची प्रक्रिया वेळेवर व नियमित करणे.

२)रीडिंग घेण्याची प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध करणे.

३)चुकीच्या बिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व तत्पर कार्यवाही करणारा विशेष कक्ष स्थापन करणे.

      नागरिकांकडूनही या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना वेळेवर बिल मिळत नसल्याने उशीराची दंडात्मक रक्कम भरावी लागते, तर काहींना चुकीच्या रीडिंगमुळे हजारो रुपयांची अवास्तव बिले भरावी लागत आहेत. महावितरणने या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आळंदीकर नागरिक आणि शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे.