दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद हद्दीतील कमलेश ऑटो ते आळंदी रोडवरील अपुऱ्या क्षमतेच्या आणि चोकअप झालेल्या ड्रेनेज लाईनमुळे काळे कॉलनी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पाणी उडणे आणि दुर्गंधीचा त्रास होत होता.
यासंदर्भात नागरिकांनी आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे तक्रारी मांडल्या होत्या. चव्हाण यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून आळंदी नगरपरिषद आणि शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य भगवान पोखरकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाअंतर्गत आळंदी नगरपरिषदेसाठी २५ लाख रुपयांच्या ड्रेनेज कामाला मंजुरी मिळाली. शासन निर्णयानुसार, जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रशासकीय मान्यता दिली. आळंदी नगरपरिषदेने कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहिले. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सहायक अनुदान अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला. नवीन जास्त क्षमतेची ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांचा त्रास आता कमी होईल. नागरिकांनी या कामामुळे समाधान व्यक्त केले आहे.
“सदर ड्रेनेज लाईनबाबत नागरिकांनी कार्यालयात येऊन तक्रारी मांडल्या होत्या. त्यानुसार आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. नवीन ड्रेनेज लाईनमुळे काळे कॉलनी परिसरातील त्रास कमी होईल. शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले.”



