Home देशविदेश व्यवस्था : हेतू आणि परिणाम… 

व्यवस्था : हेतू आणि परिणाम… 

     व्यवस्था म्हणजे रचना स्थिती घडण.जसे की भौगोलिक रचना ही नैसर्गिक आहे,ज्यात जल जंगल भूमी याचा समावेश होतो.नद्या दर्या खोरे, डोंगर, पहाड,जमीन यांची स्थिती रचना म्हणजे भौगोलिक व्यवस्था होय.इतिहासाची रचना म्हणजे ऐतिहासिक व्यवस्था,नगर गावे रचना आणि त्यातील सुविधांची अवस्था स्थिती म्हणजे नागरि व्यवस्था होय.

     याच प्रमाणे 1. आर्थिक व्यवस्था म्हणजे वर्गीय व्यवस्था (गरीब मध्यम श्रीमंत ) . अशी व्यवस्था निर्माण करण्याचा हेतू हा ” विषमता निर्मिती ” आहे.आर्थिक दृष्ट्या असंख्य लोक गरीब असावेत,गरीबी मुळे त्यांचे श्रम विकत घेता येतील,आणि आपले कारखाने उद्योग व्यापार व्यवसाय शेती यातून भरपूर कमाई करता येईल,शिकलेले कर्मचारी कार्यालयीन कामासाठी वापरता येतील,श्रमिक आणि कर्मचारी यांना कमीत कमी पगार देऊन त्यांचे कडून जास्तीत जास्त कामे करून घेऊन भरमसाठ नफा कमावता येईल या हेतूने गरीब आणि मध्यम हा वर्ग कायम असले पाहिजेत,तरच श्रीमंत वर्ग टिकेल,आणि हे दोन वर्ग नसतील तर श्रीमंत वर्गच नाहीसा होईल.याचा अर्थ गरीब आणि मध्यम वर्गीयांचे आर्थिक शोषण पिळवणूक करूनच श्रीमंत होता येते.पिळवणूक नाही केली तर श्रीमंत वर्गच टिकणार नाही,या विषमतावादी हेतूने भिकारी,दरिद्री, अतिगरीब,गरीब , कनिष्ठ,वरिष्ठ मध्यम वर्ग म्हणजेच चतुर्थ श्रेणी,तृतीय श्रेणी,द्वितीय श्रेणी,प्रथम श्रेणी कर्मचारी, असे वर्ग करून मध्यम वर्ग निर्माण केला,तसेच श्रीमंत,उच्च श्रीमंत,आणि गर्भ श्रीमंत म्हणजे जमीनदार कारखानदार असे आर्थिक वर्ग निर्माण करून ही अर्थव्यवस्था रचना कायम केल्या गेली.हे यातील वरचा वर्ग खालच्या वर्गावर अधिकार गाजवतो,आणि त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असतो.अशा प्रकारे ही आर्थिक शोषणाची व्यवस्था निर्माण केल्या गेली.या व्यवस्थेचे परिणाम म्हणजे महागाई,भ्रष्टाचार,काळाबाजार,व्यसन,तस्करी,नक्षलवाद,साठेबाजी ( परिग्रह ). बेकारी,बेरोजगारी ,चोऱ्या मारामाऱ्या,दरोडा,जुगार इत्यादी .हे आर्थिक विषमतेचे परिणाम आहेत.

2.भौगोलिक शोषण : जमीन जंगल पाणी हे सुद्धा आर्थिक समृद्धी निर्माण करणारी नैसर्गिक साधन संपती आहे,झाडे तोडून त्यांची विक्री करून पैसा कमावता येतो,झाडापासून फळे फुले औषधी मिळतात म्हणून श्रीमंत लोक जंगल विकत घेतात,गुत्तेदार सरकारकडून जंगल विकत घेऊन झाडे तोडून पैसे कमवतात,त्यातून भरपूर नफा मिळवितात.मोठमोठे कारखानदार बोडकी माळरान सरकारकडून अल्प दरात विकत घेऊन तेथे सूर्य ऊर्जा प्रकल्प उभारतात,वीजनिर्मिती करून ती सरकारलाच विकतात आणि पैसा कमवतात,शेकडो एकर जमीन श्रीमंत लोक घेऊन त्यावर कारखाने उभारतात.ज्या जमिनीत, माळरानात ,जंगल जमिनीत खनिजे आहेत,म्हणजे कोपर,अर्भक,लोखंड,तांबे,चांदी,सोने,रासायनिक पदार्थ असलेली जमीन विकत घेऊन जमिनी खोदतात,त्यातून खदान निर्माण होऊन,ती कोसळतात,त्यात कित्येक मजूर मारतात.लाखो एकर शेतीयोग्य सुपीक जमीन बिनकामी होते,लाखो एकर जंगल कापल्या जाते,यामुळे पर्यावरणाचा रहास होतो,पर्यावरण संतुलन बिघडते,म्हणून अती उष्णता , अती थंडी , अती पावसाळा ,आणि त्यामुळे ओला कोरडा दुष्काळ,पडतात.भौगोलिक शोषण केल्यामुळे हे परिणाम घडतात,परंतु शोषक वर्गास याचे काही देणे घेणे नसते,त्यांचा हेतू फक्त पैसा कमविणे आणि ऐश्वर्याचे जीवन जगणे हाच असतो,बाकी जनता मेली काय अन राहिली काय ,याचे त्यांना काहीच देणे घेणे नसते,शोषक वर्ग हा खाटकाच्या काळजाचा असतो.

3.सामाजिक व्यवस्था : ही जाती व्यवस्था आहे,सर्व माणसांची सारखीच अवयव असताना पण मानवजातीत अनेक जाती निर्माण केल्या गेल्या,एवढ्यावरच न थांबता जातीची उतरंड तयार करून त्यात उच्चनीचता आणि भेदभाव निर्माण केला,आणि निंदनीय गोष्ट अशी की त्यात अस्पृश्यता निर्माण करून जगात भारत देशाला कलंक लावला.हे सारे परिणाम केवळ सामाजिक विषमतेची व्यवस्था रचना केल्यामुळे निर्माण झाले.यामागचा हेतू पण शोषणा चाच होता.चार वर्ण निर्माण करून फक्त वरच्या जातीलाच सर्व अधिकार आणि हक्क दिले.ब्राम्हण क्षत्रिय वैश्य या 15 टक्के जातीला मानसन्मान दिला,आणि 85 टक्के ( ओबीसी,एस सी, एस टी ) जातींना शिक्षणाचा ,संपती बाळगण्याचा,शस्त्र बाळगण्याचा म्हणजे स्वसंरक्षणाचा हक्क नाकारला,मनुस्मृती हे संविधान कायदा लागू करून 85 टक्क्यांचे आर्थिक ,शैक्षणिक शोषण केले,संधी आणि दर्जा मानसन्मान हिरावून घेतला हे सारे परिणाम सामाजिक विषमतेवर आधारित व्यवस्था निर्माण केल्यामुळे झाले.या मागचा हेतू म्हणजे आपले वर्चस्व,धाक असावा,आणि आर्थिक शोषण करता यावे हाच होता.कारण 85 टक्के लोकांनी फक्त वरच्या 15 टक्क्यांची सेवा करावी , त्याबद्दल मोबदला मिळणार नाही,फक्त पोटापुरते तेही उष्टे शिळे कच्चे अन्न निकृष्ट अन्न मिळेल,त्यांनी फक्त श्रम करावे,हाच त्यांचा धर्म होय,असे शिक्षण देऊन त्यांची मानसिकता दृढ करण्यात आली.85 टक्केना गुलाम बनविण्यात आले.त्यांना देव धर्म शास्त्र शस्त्र शिक्षण संपती या सर्वच विषयाचा त्यांचा मानवी अधिकार नाहीसा करण्यात आला.आणि तोही मनुस्मृतीच्या म्हणजे या संविधानाच्या कायद्याच्या आधारे.विषमतेचे अमानवी कडक कायदे करून त्या कायद्यांची अंमलबजावणी पण कडक करण्यात आली,यास कार्ल मार्क्स, गौतम बुद्ध,चार्वाक, महात्मा बसवेश्वर,महात्मा फुले,कबीर,गाडगेबाबा,बाबासाहेब आंबेडकर ,चक्रधर स्वामी ,रामास्वामी पेरियार अशा काही विभूतींनी त्यांच्या काळात ही विषमतेची शोषणाधारीत समाजव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला,परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले म्हणून सारे जग ,सारे देश अणुबाँब च्या कैचीत अडकले आहेत.अहिंसेचा पराभव आणि हिंसेचा प्रभाव दिसून येतो.शोषण आणि शोषक वर्ग अधिकच बळकट होताना दिसत आहे.याचे कारण 85 टक्के असूनही 15 टक्केचा पराभव करू शकत नाहीत,याचे कारण यांची ही विषमतेची मानसिकता दूर झाली नाही.जातीभेद धर्मभेद अजूनही या 85 टक्के वाल्या ना महत्वाचा वाटतो,त्याची आवश्यकता नसताना,त्याचे वाईट परिणाम भोगताना पण या विषमतावादी व्यवस्थेचे महत्त्व यांना वाटते.हे अद्न्यान जो पर्यंत नष्ट होणार नाही,तो पर्यंत या विषमतावादी व्यवस्थेचे हे आर्थिक भौगोलिक सामाजिक धार्मिक दुष्परिणाम भोगतच रहावे लागेल.

       लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक: 10 जून 2025.फोन: 9420912209.