ऋषी सहारे
संपादक
पुणे : विश्रांतवाडी येथील समाजकल्याण वस्तीगृहात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणे ही अत्यंत अन्यायकारक, असंवेदनशील आणि दडपशाहीची कारवाई आहे, असा तीव्र निषेध आजाद समाज पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे ही मुले गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या पुण्यात ते समाजकल्याण वसतिगृहात उच्च शिक्षण घेण्यासाठी राहत असल्याची माहिती आहे.
सदर कार्यक्रमात “हिडमा” या गाण्यावर नृत्य सादर केल्यामुळे गडचिरोली येथील किरण गोमासे व श्रीनिवास कुमरी या दोन निष्पाप विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे विद्यार्थी शिक्षण घेणारे असून त्यांचा कोणत्याही प्रकारच्या नक्षलवादी विचारसरणीशी संबंध नाही. केवळ आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन केल्याबद्दल त्यांना गुन्हेगार ठरवणे हे संविधानिक मूल्यांना हरताळ फासणारे आहे.
शासनाने पाहिजे तर गाण्यावर बंदी घालायला पाहिजे. Youtube वर हे गाणे सहज उपलब्ध असून शासनाने गाणे निर्माण करणाऱ्यावर, स्टुडिओ वर आणि नेट वर उपलब्ध करणाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. जर संबंधित गाण्यावर कोणतीही अधिकृत बंदी नाही, तर त्या गाण्यावर नृत्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांवर कारवाई करणे हे कायद्याचा चुकीचा वापर आहे, तर्कसंगत व न्यायसंगत नाही. ही कारवाई विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालणारी असून त्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक आयुष्यावर गंभीर परिणाम करणारी आहे.
आजाद समाज पक्ष प्रशासनाला स्पष्ट इशारा देत आहे की, या प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांवर दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घ्यावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.
न्याय, समता आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही.


