Home देशविदेश प्रश्न, लढाई ,आणि जनता… 

प्रश्न, लढाई ,आणि जनता… 

      व्यक्तीचे प्रश्न आणि जनतेचे प्रश्न यात फरक आहे.प्रश्न म्हणजे समस्या,अडचण,त्रास.व्यक्तीचे प्रश्न हे त्याचे स्वतःचे असतात,म्हणजेच व्यक्तिगत प्रश्न आणि जनतेचे प्रश्न म्हणजे सामूहिक प्रश्न.

          सामूहिक प्रश्न सोडवायचे असल्यास जनतेने एकत्रित येऊन त्या प्रश्नासाठी लढाई केली पाहिजे,तरच प्रश्न सुटु शकतो,आणि ती लढाई प्रश्न सुटे पर्यंत चालूच ठेवली पाहिजे.

       प्रश्न समस्या अडचणी मग त्या व्यक्तिगत असोत की सामूहिक ,त्या संघर्ष केल्याशिवाय सुटत नाहीत.” देरे हरी पलंगावरी ” म्हटल्याने हरी देत नाही.त्यासाठी व्यक्तिगत प्रश्न असतील तर व्यक्तिगत आणि सामूहिक प्रश्न असतील तर सामूहिक लढाई करावी लागते,तरच प्रश्न सुटतात.तुकाराम महाराज म्हणतात ” रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ” जीवन म्हणजेच संघर्ष. जन्मताच कुणीही सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन आला नाही.तो संघर्ष करूनच मिळवावा लागतो.सतत संघर्ष करणे म्हणजेच लढाई होय.प्रश्नाचे उत्तर जो पर्यंत मिळणार नाही,तोपर्यंत संघर्ष करीत राहणे म्हणजे लढाई होय.समस्या सोडविताना आळसामुळे,त्रासामुळे,दिरंगाईमुळे,अडथळे आल्यामुळे, संकटे आल्यामुळे शत्रू निर्माण होत असल्यामुळे,कुणीतरी नाराज होत असल्यामुळे प्रश्नाची लढाई सोडून दिली तर प्रश्न सुटणार नाहीत.त्यासाठी जिद्द,चिकाटी,हिम्मत,सातत्य या गोष्टी महत्वाच्या आहेत.यांची तयारी असेल तरच व्यक्तिगत असो की सामूहिक लढाई,ती लढायची असते,अन्यथा तो प्रश्नच हाती घेता कामा नये.

      माणूस जीवन जगताना अनेक समस्या त्यास भेडसावतात, एकाच क्षेत्रातील नव्हे अनेक क्षेत्रातील समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यातील आर्थिक समस्या फारच महत्त्वाच्या आहेत.जसे की,रोजगार नाही,नोकरी नाही,शेती करायला पैसे नाहीत,कर्ज होऊन बसलय,महागाईने कंबरडे मोडले,घरपट्टी, पाणी पट्टी ,वायदा भरायला पैसे नाहीत,सावकाराचे भरमसाठ व्याज,फायनान्स वाले करीत असलेली लूट,भ्रष्टाचार, काळाबाजार,साठेबाजी,दामदुपट किंमत,असे कितीतरी प्रश्न आहेत,जे व्यक्तिगत तेच सामूहिक ठरतात.हे सामूहिक प्रश्नावर जनता संघटित होऊन रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे,तरच हे प्रश्न सुटतील.

   सामाजिक प्रश्न पण आहेत जसे की, हुंडाबळी,बलात्कार,महिलांचा कौटोंबिक छळ हिंसा त्रास,स्त्रीपुरूष असमानता,महिलाना देण्यात येणारी दुय्यम दर्जाची वागणूक,स्त्री पुरुषांच्या लैंगिक समस्या,अडचणी, अस्पृश्यता भेदभाव,दलीत आणि अल्पसंख्याक समाजावर होणारे अन्याय अत्याचार.बहुसंख्य जातीचा अल्पसंख्य जातीवर दबाव.इत्यादी अजूनही.

        राजकीय समस्या उदा.निवडून दिलेला उमेदवार पाच वर्ष कधी येऊन ” तुमच्या समस्या काय ? ” म्हणून विचारीत नाही.भेटायला गेले तर भेटतच नाही.विधानसभा आणि लोकसभेत आपल्या हिताचे,आपले प्रश्न सुटण्याचे कायदे होत नाहीत,झाले तर त्यांची अंमलबजावणी करीत नाहीत,योजनांची अर्धवट आखणी करतात,त्या सर्वासाठी एकदाच देत नाहीत,म्हणून संघटनेत फूट पडते,लग्गा लावावा लागतो,लाच द्यावी लागते,कार्यालयीन कामांची दिरंगाई,कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा,योजना घेण्यासाठी दहा हेलपाटे मारणे, शेतकरी कामगार कष्टकरी यांचे विरोधी कायदे करणे,श्रीमंतीचा फायदा करणारे कायदे करणे ,रस्ते,वाहतूक, वीज ,पाणी ,सार्वजनिक स्वच्छता इत्यादी नागरी प्रश्न,निकृष्ट शिक्षण,शाळेत सुविधा नाहीत,जिथे मुले जास्त तिथे शिक्षक कमी आणि जिथे मुले कमी तिथे शिक्षक जास्त,शिक्षकांना इतर शासकीय कामे लावल्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष्य,शिक्षकांच्या शाळेला दांडी मारणे,गरीब मुलांना शालेय साहित्यासाठी पैसे नसणे, फी भरायला पैसे नसणे,इंग्रजी शाळांना मान्यता देऊन मराठी शाळा बंद पाडणे,शाळेला शैक्षणिक,खेळाचे,साहित्य नसणे,प्रयोग शाळा नाहीत,मुलांच्या सुप्तगुणाना वाव मिळेल असे उपक्रम राबविल्या जात नाहीत, होमवर्क करून घेण्याची क्षमता पालक वर्गाची नाही,अशा अनेक शैक्षणिक समस्या आहेत.

       आरोग्याच्या समस्या : गावात प्रथमोचार ची सोय नाही, श्रीमंतांसाठी सुपर स्पेशालिस्ट दवाखाने आणि गरिबासाठी निकृष्ट दर्जाचे सरकारी दवाखाने हा भेदभाव ही एक फारच मोठी समस्या आहे.

          शिक्षण आणि औषधोपचार शासकीय खर्चांनी झाला पाहिजे,प्रत्येक नागरिकाचे मुफ्त शिक्षण ,मुफ्त आरोग्याच्या सोयी असल्या पाहिजेत,असे संविधानात नमूद केलेले असूनही त्याची अंमलबजावणी हे मंत्री करीत नाहीत,आमदार पण याबद्दल ब्र शब्द बोलत नाहीत.गरिबाना औषधी विकत घेणे शक्य नसते.ऑपरेशन खर्च झेपत नाही.याबद्दल निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आवाज उठवीत नाहीत.

        अशाप्रकारे जनतेचे अनेक प्रश्न आहेत,परंतु जनता दुबळी आहे,असंघटित, अडाणी आहे,परावलंबी मानसिकतेची आहे.कारण संस्कृतीने आणि धर्माने जनतेला परावलंबी बनविले आहे, पंगु बनविले आहे, अंधश्रध बनविले आहे.दैवावर आणि देवावर भरोसा ठेऊन हतबल निष्क्रिय जनता झाली आहे.देव करील ते होईल, दैवा त आहे तसे घडते,असे शिक्षण धर्माचे असल्यामुळे जनता देव वादी आणि दैववादी बनलेली आहे,प्रयत्नवादी बनण्या ऐवजी.

        देवाचा आणि दैवाचा आणि आपल्या प्रश्नांचा समस्यांचा काहीच संबंध नाही,देव दैव यामुळे आपल्या समस्या निर्माण झाल्या ,त्यामुळे त्यानुसारच घडेल ही अंधश्रधा काढून टाकायला पाहिजे.समदुःखी लोकांनी एकत्र आले पाहिजे,संघटित झाले पाहिजे.आपल्या समस्यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे,समस्यांची कारणे शोधली पाहिजेत,समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्ता ,समाजसेवक, नेता निवडला पाहिजे,लोकशाही पद्धतीने निर्णय झाले पाहिजेत.आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजे.यासाठी कुण्या एका नेत्यावर नेतृत्वावर अवलंबून न राहता,संघटनेवर भरवसा पाहिजे,नेतृत्व चुकीचे असले तर ते बदलले पाहिजे.पण संघटना मजबूत असणे गरजेचे आहे.आणि संघटनांनी रस्त्यावरची लढाई केली पाहिजे.एखाद्या मंत्र्याच्या किंवा त्याच्या प्रतिनिधीची लाचारी पत्करून नव्हे तर आपल्याच ताकदीवर लढाई केली पाहिजे, ती जिंके पर्यंत लढतच राहिले पाहिजे.अपयश आले तरी.कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. सातत्य,जिद्द,प्रयत्न,आत्मविश्वास,धैर्य महत्वाचे आहे,आणि सर्वात महत्वाचे हे की,आपली समस्या सत्य असली पाहिजे,सत्यासाठी म्हणून लढले पाहिजे,तरच ती न्यायची लढाई होऊ शकते.सत्यासाठी ,न्यायासाठी लढाई असावी तरच आज नसले तरी उद्या का होईना जीत आपलीच असते.कारण सत्य आणि न्यायाला मरण नाही.म्हणूनच म्हण आहे ” सत्यमेव जयते “. कधीही सत्याचाच विजय होतो,असत्य,ढोंग या गोष्टी अयशस्वीच होतात.

         यासाठी ज्याचे पोट दुखते त्यांनीच ओवा खावा लागतो,म्हणून जनतेने आपले प्रश्न आपणच संघटित होऊन सतत संघर्ष करून सोडवायचे असतात.आणि सच्चे कार्यकर्त्यांनी सतत जनतेचे ऐरणीवरचे प्रश्न म्हणजे तात्कालिक प्रश्नावर जनतेला रस्त्यावर उतरविले पाहिजे,त्यातूनच संघटन मजबूत होत असते,आणि कार्यकर्ते घडत असतात.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक : 9 जून 2025..फोन : 9420912209.