दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : मागील काही दिवसापासून चर्चेत असलेल्या भाजप आळंदी शहर मंडल अध्यक्ष पदाची नियुक्ति अखेर जाहीर झाली असून या पदावर आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांना संधी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे नियुक्ती पत्र दिले आहे.
यावेळी केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आ.राहूल कुल, राजेश पांडे, शरद बुट्टे पाटील, प्रदिप कंद, संजय घुंडरे, अशोक उमरगेकर, राम गावडे, किरण येळवंडे उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या नवीन पक्ष संघटना बांधनी धोरणानुसार मंडल अध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे. साधारणतः १०० बुथ मिळून एक मंडल अध्यक्ष अशी संरचना करण्यात आली आहे. याच अनुषंगाने आळंदी शहर मंडल अध्यक्षपदी वैजयंता उमरगेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे भाजप नेते संजय घुंडरे यांनी सांगितले.
आगामी आळंदी नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचे उत्तम प्रकारे बांधनी करत नगरपरिषदेच्या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची योग्य धोरणे व विविध जनसामान्यांच्या हक्कासाठी तयार करण्यात आलेल्या लाभाच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे उमरगेकर यांनी सांगितले.



