Home Social कार्यकर्त्यांनो,स्वतःमधील अंतर्विरोध ओळखा :- जगदीश काबरे…

कार्यकर्त्यांनो,स्वतःमधील अंतर्विरोध ओळखा :- जगदीश काबरे…

       ‘आमचा देवाधर्माला विरोध नाही,पण देवाधर्माच्या नावाखाली समाजात होणाऱ्या शोषण प्रक्रियेला मात्र विरोध आहे, देवाधर्माच्या नावाखाली पसरवलेल्या अंधश्रद्धांना मात्र विरोध आहे.’ ही रास्त भूमिका घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) महाराष्ट्रात सुमारे चाळीस वर्षे कार्यरत आहे. अंनिस कोणाच्याही धर्मभावना दुखावत नाही किंवा नाकारतही नाही. 

           कारण देवाधर्माच्या बाबतीत ती तटस्थ आहे.यावरून समितीत काम करणारे कार्यकर्ते हे सगळेच देवधर्म नाकारणारे नसतात, हे स्पष्ट होते. लोकांच्या चांगुलपणाला साद घालून त्यांना विवेकी विचारांकडे वळवणे, हे अंनिसचे महत्वाचे कार्य आहे. या भूमिकेबरोबरच अंनिसचे असे म्हणणे असते की,अंनिस ही शब्दप्रमाण्य आणि ग्रंथप्रामाण्यालाही नाकार देते.

          काही लोकांना अंनिसची ही भूमिका सोयीस्करपणे घेतलेली वाटू शकते. कारण त्यांच्या मते ज्या देवाधर्मामुळे या अंधश्रद्धा आणि शोषण प्रक्रिया वाढीस लागलेल्या आहेत त्या देवाधर्माला विरोध न करता फक्त अंधश्रद्धा आणि शोषणाला विरोध करणे म्हणजे मुळावर घाव न घालता फांद्या छाटण्याचा कार्यक्रम करणे होय. पण ते हे विसरतात की, शेकडो वर्षे सामान्य लोकांमध्ये देवाधर्माची कल्पना रुजवली गेलेली आहे. परिणामी सामान्य माणसाच्या मनात तिची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत.ती एका झटक्यात नष्ट करता येणे शक्य नाही. त्यामुळे लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हे प्राथमिक काम आहे आणि या प्राथमिक कामाला अंनिस महत्व देते.म्हणून अंनिसने ही घेतलेली भूमिका रास्तच आहे असे म्हणायला हवे.

         असा विचार करता हे सगळे अगदी योग्य वाटते. पण तरीही कार्यकर्त्यांच्या बाबतीत एक सूक्ष्म अंतर्विरोध डोकावतांना दिसतो, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? निदान चळवळीने 40 वर्षे पूर्ण केल्यानंतर तो लक्षात यायला हवा.

           अंनिसमध्ये सुरुवातीला आलेले कार्यकर्ते हे देवधर्म मानणारे असतात, शब्दप्रमाण्य आणि ग्रंथाप्रमाण्यही मानणारे असतात; हे सुरुवातीच्या काळात एक वेळ क्षम्य म्हणता येईल. जसजसे ते अंनिसमध्ये कार्यरत होतात तसे त्यांचे वाचन वाढायला लागते, ते चिंतन, मनन करायला लागतात, चर्चामध्ये सहभागी होतात. त्यातून त्यांचा देवधर्माकडे ओढा कमी होतो. नास्तिकतेकडे त्यांच्या प्रवासाची सुरुवात होते. 

          पण तरीही असे काही कार्यकर्ते असतात की जे अनेक वर्षे या चळवळीत कार्यरत असूनही आपल्या धर्मातील ग्रंथप्रामाण्य नाकारायला तयार होत नाहीत. खरे तर त्यांनी चार्वाकांसारखे धर्मातीत व्हायला नको काय? 

          स्पष्ट बोलल्याशिवाय याचे स्पष्टीकरण होणार नाही, म्हणून थोडे स्पष्टच बोलतो.अंनिसमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा विविध धर्मातील कार्यकर्ते कार्यरत आहेत.त्यातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी जातीयता आणि धार्मिकताही सोडलेली आहे.काही देवधर्मही नाकारण्याच्या मार्गावर आहेत. शब्दप्रमाण्यालाही नकार देत आहेत.

            हा सगळा कार्यकर्त्यांच्या मनात चाललेल्या घुसळणीचा परिपाक आहे.पण हिंदू,बौद्ध आणि ख्रिश्चन कार्यकर्ते,ग्रंथप्रमाण्य ज्या सहजतेने नाकारताना दिसतात,या पार्श्वभूमीवर मुस्लिम कार्यकर्ते मात्र कुराणाचे ग्रंथप्रामाण्य नाकारण्यास सहजपणे तयार होत नाहीत,असा माझा अनुभव आहे. 

           जिज्ञासूंनी याचा पडताळा घेण्यासाठी आपल्या परिसरातील अंनिसमधील मुस्लिम कार्यकर्त्यांना ‘ते कुराणाचे ग्रंथप्रामाण्य नाकारायला तयार आहेत का?’ असा प्रश्न विचारावा. त्याचे प्रामाणिक उत्तर त्यांनी द्यायचे ठरवले तर तुम्हाला मी असे का म्हणतोय ते कळेल. 

          अर्थात अपवाद सगळीकडेच असतात.यात सर्वात ठळक नाव उठून दिसते ते म्हणजे प्रख्यात विचारवंत हमीद दलवाई यांचे. तसेच कैफी आझमी,जावेद अख्तर नसिरुद्दीन शहा,इरफान खान यांच्यासारखे नामवंतही कुरणाचे ग्रंथप्रमाण्य नाकारणारे आहेत. 

          याबरोबरच मुस्लिम सत्यशोधक मंडळातील काही कार्यकर्तेही कुरणाचे ग्रंथप्रमाण्य नाकारतात. त्यामुळे सगळेच मुस्लिम कार्यकर्ते ग्रंथप्रामाण्य नाकारणारे नसतात असे माझे म्हणणे नाही.माझे म्हणणे अंनिस चळवळीतील कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित आहे.

         यात कोणाला मी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करत आहे आणि कार्यकर्त्यात फूट पडत आहे असे वाटण्याची शक्यता आहेच. पण तो कटूपणा पदरी घेऊन कधीतरी आपण परखडपणे आपल्याच कार्यकर्त्यांचा अंतर्विरोध त्यांना दाखवून आणि समजावून देणे आवश्यक आहे, असे मला वाटते. अंनिस जर एकदिलाने काम करणारी चळवळ आहे, तर अंनिसमधील सर्व धर्मातील कार्यकर्त्यांनीसुद्धा एकदिलानेच काम केले पाहिजे.”त्यासाठी सर्वांनी अंनिसची भूमिका तंतोतंत पाळली पाहिजे. 

      अन्यथा सोयीस्कर भूमिका घेणारे कार्यकर्ते म्हणजे फक्त बोलके सुधारक ठरतात.अशा तथाकथित सुधारकांकडून फार मोठी अपेक्षा बाळगता येत नाही.

      कारण ते बाहेर लोकांचे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न करत असतात.पण स्वतः मात्र ग्रंथप्रामाण्य न नाकारता घरात अंधश्रद्धा जोपासत रहातात.त्यांचा हा अंतर्विरोध आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे आणि त्यांनाही तो समजावून देत विवेकी वागण्याकडे वळवले पाहिजे.

       नाहीतर त्यांचे असे वागणे म्हणजे ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण!’ या म्हणीची आठवण करून देणारे ठरते. विचार तर कराल?