बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
सत्ता सामान्य जनतेसाठी राबवायची असते हे सूत्र दादांनी राबविले.देशात नव्हे तर जगात जनतेसाठी सकाळी 6 वा.काम करणारा दुसरा नेता नाही.
दादा मनाने अतिशय मोठ्या उंचीचे होते,असा दादा होणे नाही,या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे वर्णन केले.
अजितदादांना बावडा येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शोकसभेत शुक्रवारी (दि. 30) श्रद्धांजली अर्पण केली.
गेली दोन दिवस आंम्ही बारामतीत सातत्याने आहोत,परिस्थिती अडचणीची आहे,यातून मार्ग काढावा लागेल,पवार कुटुंबीय संकटात आहे,सुनेत्रावहिनींनी काय करायचे,पवार साहेबांनी या वयात काय करायचे,पार्थला कोणाचा आधार आहे,सर्वांनाच कोणाचा आधार राहिला आहे,हे संकट दूर करायचे आहे असे बोलत असताना हर्षवर्धन पाटील भावनिक झाले,त्यांचे डोळे पाणावले…
त्यानंतर डोळे पुसत स्वतःला सावरत हर्षवर्धन पाटील यांनी भाषण सुरू ठेवले.हर्षवर्धन आता संघर्ष नको,दोन्हीं राष्ट्रवादीनी एकत्र येऊन काम करावे अशी दादांची गेली महिनाभरापासून भावना होती.
त्यासाठी झालेल्या 6 बैठकांना मी उपस्थित होतो.दादा व माझेमध्ये वैयक्तिक मैत्री होती.वीस वर्षे मंत्रिमंडळात आंम्ही एकत्र काम केले.सहकार चळवळीतून परिवर्तन करणारे दादा होते.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आंम्ही 12 वर्षे एकत्र काम करीत होतो.
त्यावेळी दिल्लीतील सहकारातील कामे ते मला सांगायचे व राज्यातील सहकारातील प्रश्नांसंदर्भात दादा मला नोट तयार करण्यास सांगून ते कॅबिनेटमध्ये शेतकरी हिताचे निर्णय घ्यायचे,असा दोघांमध्ये नेहमीच संवाद होता.
दादांच्या अचानक जाण्याने राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
बारामतीत काल गुरुवारी पवार साहेबांची गोविंद बागेत जाऊन जयवंतराव पाटील व आंम्ही चार-पाच नेत्यांनी भेट घेतली व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.
अजितदादांच्या जाण्याने राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,त्यामुळे राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून सुनेत्रावहिनी,खा.सुप्रियाताई,रोहित पवार,पार्थ पवार आदी सर्वांची जबाबदारी वाढली आहे.त्यांच्या पाठीशी सर्वांनी राहण्याचे आवाहन याप्रसगी हर्षवर्धन पाटील यांनी केले…
यावेळी अंकिता पाटील ठाकरे,प्रशांतराव पाटील,उदयसिंह पाटील,अँड. अनिल पाटील,मनोज पाटील,पंडितराव पाटील,अमरसिंह पाटील,डॉ. लक्ष्मण आसबे,सुरेश शिंदे,दत्तात्रय तोरसकर,रणजित घोगरे यांनीही मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
चौकट….
हर्षवर्धन मी तुमच्या घरी जेवायला येतोय…दादांचा फोन…
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे म्हणून मुंबईमध्ये झालेल्या 6 बैठकांना मी उपस्थित होतो.तसेच गेल्या रविवारी (दि. 18) अजितदादांचा फोन आला..हर्षवर्धन मी तुमच्या घरी जेवायला येतोय… दादा 7 वा.एकटे घरी आले.. तासभर दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या… हर्षवर्धन..मनामध्ये काही ठेवू नका असे दादा यावेळी अनेकदा बोलले..एवढ्या उंचीचा माणूस निर्माण होणे शक्य नाही..
त्यानंतर भरणे मामा व जिल्ह्यातील नेत्यांना बोलावून आंम्ही रात्री 10 वा. पर्यंत जिल्ह्यातील निवडणूक आराखडा व विविध विषयांवर चर्चा केली…असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
चौकट….
दादांची इंदापूर तालुक्यात बुधवारी सभा घेण्याची इच्छा होती :- हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील म्हणाले,विमान अपघाताच्या आदल्या दिवशी मंगळवारी (दि. 27) सकाळी 7.30 वा. दादांचा मुंबईवरून फोन आला.
यावेळी सुमारे 20 मि. आमची चर्चा झाली.त्यानंतर दुसऱ्या वेळी फोनवर कॅबिनेट बैठकीला सभागृहात पोहोचेपर्यंत दादा बोलत होते…
बुधवारी (दि.28) दादांना वेळ होता.. इंदापूर तालुक्यात बुधवारी 1 किंवा 2 सभा घेण्याची दादांची इच्छा होती, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.
चौकट…
पवार कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहा :- हर्षवर्धन पाटील
पवार साहेबांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन काम करावे,अशी दादांची इच्छा होती.त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबीयांच्या पाठीशी संयमाने सर्व शक्ती व ताकदीनिशी उभे राहावे,असे आवाहन याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले.



