लाडक्या ज्ञानदादाकडे पोहोचली मुक्ताईंची राखी…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

अळंदी : संपूर्ण जगाला मानवतावाद देणाऱ्या लहानग्या भगिनीचे बंधूप्रेम आजही जपण्याचे काम श्रीक्षेत्र मेहूण येथील देवस्थानाकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर तापीतीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून श्रीक्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्‍वर आणि सासवड अशा तिन्ही ठिकाणी पाठविण्यात आली. या तिन्ही ठिकाणी संत मुक्ताईंची राखी भावंडांच्या चरणी अर्पण करण्यात आली. संत मुक्ताबाई संस्थांनच्या वतीने पुरुषोत्तम वंजारी यांनी सपत्नीक माऊलींना पुजा अभिषेक करुन मुक्ताईची राखी लाडक्या ज्ञानदादाच्या समाधीस भक्तिभावाने अर्पण केली. यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, हभप सागर महाराज लाहूडकर, संदीप पालवे उपस्थित होते. यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने ज्ञानदादाकडून आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट दिली असे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

          आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना मोठे महत्त्व असून, त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण-भाऊ यांचे नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे काम हा सण करतो. बाराव्या शतकात संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्‍वर, संत सोपानदेव आणि आदिशक्ती संत मुक्ताई. या चारही भावंडांना तत्कालीन समाजाचा अतोनात त्रास सहन करावा लागला होता. अशातही या भावंडांनी जगाचा उद्धार करण्याचे काम केले. समाजाच्या त्रासाला कंटाळून झोपडीत दार बंद करून बसलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांना लहानग्या मुक्ताईने ताटीचे अभंग रचून आळवणी केली. मोजके व अर्थपूर्ण शब्द आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी आग्रहपूर्वक केली जाणारी ‘ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा’ ही विनवणी होती. यामुळे ज्ञानेश्‍वर महाराज ताटी उघडून बाहेर येऊन त्यांनी मुक्ताईंच्या डोक्यावर हात फिरवून प्रेमाने कौतुक केले. त्यानंतर श्रीमद्भगवद्गीतेवर टिका करून जगत्मान्य असा ज्ञानेश्‍वरी ग्रंथ लिहिला.