आळंदीत शिवजन्मोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांच्या सुरावटी आणि कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात मिरवणुकीने तिथीनुसार शिवजयंती गुरुवारी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली.

          आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने अभिषेक व पुजन करण्यात आले.

          यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी कैलास कैंद्रे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परीसराचा आकर्षक नुतनीकरण करण्यात आले आहे. शिवपराक्रमाची गाथा असलेल्या पोवाड्यांचे चैतन्यदायी सूर स्मारक परीसरात घुमत होते.

           एक गाव एक शिवजयंती उत्सव निमित्ताने आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने चाकण चौक येथून सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्यदिव्य नेत्रदीपक मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज येथे रात्री ९:३० वा. मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

          सकाळ पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, वारकरी, प्रशासन, आळंदीकर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परीसराचा कायापालट केल्याबद्दल आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवजयंती निमित्त आळंदी पोलिस स्टेशनच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.