पुन्हा मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अशी माझी इच्छा आहे.:- डॉ.श्रीपाल सबनीस… — हिंदू धर्म वाईट नाही तर त्यातील कर्मकांड वाईट आहेत.:- डॉ.श्रीपाल सबनीस… — वसंत साळवे आणि संजीवनी कदम यांना डॉ.सबनीस यांच्या हस्ते ‌’रमाईरत्न पुरस्कार’ प्रदान…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे रेटली जात आहे. या संकल्पनेपासून सावध रहावे लागेल. धर्माचे शुद्धीकरण हे आव्हान असले तरी ते आज आवश्यक आहे. माणसे धर्मांध बनली आहे. धर्माच्या कर्मकांडाला ती बळी पडत आहेत. राजकारण, धर्मकारण अशुद्ध अवस्थेत बेतले जात असताना धर्माधर्मात संवाद वाढायला हवा, हिंदू धर्म वाईट नाही तर त्यातील कर्मकांड वाईट आहेत असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.

       महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 88 व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत हरिभाऊ साळवे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजीवनी हनुमंतराव कदम यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते ‌’रमाईरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी सबनीस बोलत होते. रमाई महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड.प्रमोद आडकर अध्यक्षस्थानी होते. माजी नगरसेविका लता राजगुरू, राष्ट्रीय स्मारकचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, कुणाल राजगुरू, रमाई स्मारक समितीच्या मुख्य निमंत्रक प्रेरणा गायकवाड आदी उपस्थित होते.

         डॉ. सबनीस म्हणाले, 2024 मध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदूराष्ट्राची संकल्पना आणली जात आहे. त्यापासून सावध रहावे लागेल. पुन्हा मोदीच पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. ते होऊ नयेत, अशी माझी इच्छा आहे. ते पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्ध धर्माचा विचार मांडला. शुद्ध धर्माचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले. हिंदू धर्माचे स्वांतत्र्य तर त्यांना मान्यच आहे. मात्र, हिंदू राष्ट्राचे स्वातंत्र्य त्यांना मान्य नाही.

       साळवे यांनी लोहिया, गांधी, आंबेडकर यांच्याविषयीचा विचार मनोगतात मांडला. हे विचार वरवर वेगळे वाटतात. त्यात विसंवादही खूप आहेत. मात्र, तिन्ही वादात मानवतावाद आहे. लोहिया समाजवादी असले, तरी मानवतावादी आहेत. माणुसकी हाच त्यांचा धर्म आहेे, असे सबनीस म्हणाले. बाबासाहेबांच्या ध्येयवादाशी रमाई या एकरूप झाल्या होत्या. बाबासाहेब हे देशाला समर्पित झाले. तर रमाई बाबासाहेबांना. रमाई आणि माई आंबेडकर या दोघींचाही त्याग खूप मोठा आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

         साळवे म्हणाले, देशाला आज प्रतिगामी शक्तींपासून धोका आहे. या शक्तींविरोधात नेटाने उभे रहायला हवे. त्याकरिता आधी गांधी, लोहिया व आंबेडकरांचा विचार समजून घेतला पाहिजे. गांधीवाद, लोहियावाद व आंबेडकरवादी विचार एकत्रित करून दुसरा पर्याय देणे, ही आजच्या काळाची गरज आहे. ही तिन्ही मॉडेल एकत्र आल्यास आजच्या काळाची आव्हाने आपण पेलू शकतो. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संजीवनी हनुमंतराव कदम यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर लता राजगुरू यांनी आभार मानले.

         आंबेडकरी चळवळीत वसंत हरिभाऊ साळवे व संजीवनी हनुमंतराव कदम यांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवाद्गार ॲड.आडकर यांनी काढले.