Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ७ मध्ये शिवसेनेची ताकद वाढली… —...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ७ मध्ये शिवसेनेची ताकद वाढली… — ज्ञानेश्वर गुळंजकर व अरुणा घुंडरे यांना अपक्ष योगिता गरुड यांचा जाहीर पाठिंबा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मोठी राजकीय उभारी मिळाली आहे. अपक्ष उमेदवार योगिता गरुड यांनी आज शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर गुळंजकर व अरुणा घुंडरे यांना अधिकृत जाहीर पाठिंबा देत स्थानिक निवडणूक समीकरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला.

         योगिता गरुड यांनी सांगितले की, “प्रभागाच्या हितासाठी विकासनिष्ठ नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.” या पाठिंब्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले असून मतदारसंघात या हालचालीची मोठी चर्चा सुरू आहे. प्रभाग ७ मध्ये माजी नगराध्यक्ष स्व.नानासाहेब गरुड यांच्या कुटुंबाचा, समाजबांधवांचा जाहीर पाठिंबा गुळंजकर व घुंडरे यांच्या बाजूने उभा राहिल्याने शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्थानिक राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

ज्ञानेश्वर गुळंजकर यांचे मनोगत…

         योगिता गरुड यांच्या पाठींब्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर गुळंजकर म्हणाले की प्रभाग क्रमांक ७ च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गरुड कुटुंबाचा, समाजबांधवांचा आणि योगिता ताईंचा मिळालेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी ताकद आहे. माजी नगराध्यक्ष स्व.नानासाहेब गरुड यांनी घालून दिलेल्या लोकसेवेच्या परंपरेला न्याय देण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीला प्राधान्य देत दर्जेदार आणि शाश्वत विकासकामे करणे हेच आमचे ध्येय आहे. हा पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणादायी असून त्याचा सन्मान आम्ही कामातून करू.”

योगिता गरुड यांच्या पाठिंब्यानंतर प्रतिक्रिया देताना उमेदवार अरुणा घुंडरे म्हणाल्या…

        “प्रभाग क्रमांक ७ च्या विकासासाठी स्त्री-पुरुष समान सहभाग आणि पारदर्शक लोकसेवा ही माझी प्राथमिकता आहे. गरुड कुटुंबाचा आणि योगिता ताईंचा मिळालेला पाठिंबा हा आमच्या कार्याला नवे बळ देणारा आहे. मा.नगराध्यक्ष स्व.नानासाहेब गरुडांनी प्रभागासाठी केलेली कामे व लोकांशी राखलेला संवाद हे आमच्यासाठी आदर्श आहेत. त्या परंपरेला नवी दिशा देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. जलनिस्सारण, रस्ते, स्वच्छता, महिलांसाठी सुविधा आणि युवा उपक्रम ही आमची प्राधान्याची क्षेत्रे असतील. जनतेचा विश्वास जिंकणे हेच खरी निवडणूक आणि त्या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू.” दरम्यान, या पाठिंब्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी दिवसांत प्रचार अधिक वेगात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.