Home देशविदेश उजळ माथ्याने संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या संविधान द्रोहींवर कडक कार्यवाही करावी :-...

उजळ माथ्याने संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या संविधान द्रोहींवर कडक कार्यवाही करावी :- डॉ.अनंत दा.राऊत.. — महाराष्ट्राच्या विविध भागांत कार्यक्रम आयोजकांवर फौजदारी कारवाई करण्यासंबंधाने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी…

         ‘संविधान का बदलावे?’ असे शीर्षक असलेल्या पुस्तकाचा पुण्यामध्ये काल दि.२६ जुलै २०२५ रोजी प्रकाशन सोहळा होता.हे पुस्तक एड. शिवाजी कोकणे यांनी लिहिल्याची नोंद आहे.या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची पत्रिका काल उशिराने मला माझे मित्र सुधाकर शेलार यांच्याकडून फेसबुकद्वारे मिळाली. 

        प्रथम मी संविधान विरोधी पुस्तक लिहिणाऱ्या कोकणे यांचा,त्याचा प्रकाशन सोहळा घेणाऱ्यांचा व त्यात अध्यक्ष,वक्ते म्हणून आलेल्या सर्वांचा जाहीर निषेध करतो.हे सारे लोक संविधानद्रोही आहेत,हे स्पष्ट करतो.

       जे संविधानद्रोही असतात ते राष्ट्रद्रोहीच असतात.जे राष्ट्रद्रोही असतात ते समाजात उजळ माथ्याने फिरण्यास पात्र नसतात.त्यांची जागा तुरुंगात असते.

     म्हणून त्यांच्यावर शासनाने कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशी भूमिका मी मांडतो.शासन स्वतः होऊन या संविधानद्रोही लोकांवर कार्यवाही करत नसेल तर सर्व संविधाननिष्ठ राष्ट्रप्रेमी लोकांनी त्यांच्यावर कार्यवाही करण्यास शासनाला भाग पाडले पाहिजे.

       संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या पत्रिकेवरची नावे पाहिली तर सरळ सरळ हे लक्षात येते की हे सारे लोक वादग्रस्त आहेत.कडवे धर्मांध आहेत.संविधान विरोधी आहेत. 

       ज्या संघटनांकडून ते आलेले आहेत त्यांना संविधानाने निर्माण केलेला अशोकचक्रांकित तिरंगा हा राष्ट्रध्वज देखील मान्य नाही.हे सारे माथेफिरू राष्ट्रद्रोही असल्याचे सकृत दर्शनी लक्षात येते. 

       हे लोक भारतीय संविधानाने अनुच्छेद १९ नुसार दिलेल्या विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत आहेत.भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये जनमानस घडवण्याचा अघोरी असा राष्ट्रविरोधी प्रयत्न करत आहेत. म्हणून हे कडक कायदेशीर कार्यवाहीस पात्र आहेत.

      महाराष्ट्र सरकारने अलीकडेच विशेष जनसुरक्षा कायदा केला.अति डाव्या संघटना विशेषतः नक्षलवादी भारताचे संविधान मानत नाहीत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा कायदा केला आहे,असे महाराष्ट्र शासनाचे म्हणणे आहे.त्या कायद्यावर अनेकांचा आक्षेप आहेच. 

       भारतातील अतिउजवे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे धर्मांध लोकही संविधान मानत नाहीत.हे अति उजवे,संविधान न मानणारे हिंदुत्ववादी उर्फ मनुवादी उजळ माथ्याने कसे काय मिळवू शकतात? ‘संविधान का बदलावे’ असे पुस्तक कसे काय लिहू शकतात? त्याचा पुण्यामध्ये जाहीर असा प्रकाशन समारंभ कसा काय घेऊ शकतात? या संविधानद्रोही लोकांना सरकारचाच आतून पाठिंबा आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

        या पत्रिकेवर सहज नजर टाकली तरी लक्षात येते की यात अति उजवे हिंदुत्ववादी उर्फ मनुवादी लोक आहेत. 

         जे विषमतावादी,स्व श्रेष्ठतावादी,स्व वर्चस्ववादी व धर्मांध असतात त्यांना भारताचे समतावादी संविधान मान्य नसते.कारण जुन्या काळातील मनुवादी व्यवस्थेत त्यांच्या समूहाचे असलेले सर्व क्षेत्रातील वर्चस्व आणि श्रेष्ठत्व भारतीय संविधानाने नाकारलेले आहे. 

        सर्व भारतीय नागरिकांना कायद्यानुसार समान पातळीवर आणलेले आहे.सर्व नागरिकांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्याचे तत्त्व स्वीकारलेले आहे.जुन्या मनुवादी व्यवस्थेने ज्यांना हजारो वर्षे समान संधी नाकारली त्यांच्यासाठी विशेष संधी देण्याचे तत्त्व स्वीकारलेले आहे.

       ज्यांना जुन्या काळात आम्ही गुलाम म्हणून वागवत होतो.जे आमच्या सेवेसाठी कायम हजर राहायचे ते संविधानामुळे आता आमच्या बरोबरीला येऊ लागले आहेत ही या मनुवाद्यांच्या पोटातली खरी जळजळ आहे. 

       म्हणून ते संविधानाला बदलू पाहतात.या मंडळींना जुन्या काळात आमच्या समूहाचे जसे सर्वांवर वर्चस्व होते तसे आजही निर्माण झाले पाहिजे.आम्ही म्हणू तेच सत्य आहे.आम्ही म्हणू तेच सर्वांनी स्वीकारले पाहिजे असे या माथेफिरूंना वाटत असते.

         म्हणून जमेल त्या मार्गांनी हे लोक भारतात समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करू पाहणाऱ्या संविधानाच्या विरोधात गरळ ओकत असतात. अशाप्रकारच्या या विषारी विंचवांच्या नांग्या सर्व संविधान प्रेमी मंडळींनी जिथल्या तिथे ठेचल्या पाहिजेत. 

         कारण असले संविधान विरोधी लोक भाबड्या भारतीय लोकांच्या मनात धर्मांधता,जात्यांधता,पुराणमतवाद, परधर्मद्वेष पसरवत असतात.राष्ट्राची एकात्मता धोक्यात आणत असतात.असे हे धर्मांध लोक राष्ट्राच्या सर्व प्रकारच्या प्रगतीच्या विरोधात असतात.

       कारण त्यांच्या मनात स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता,सेक्युलॅरिझम,सत्य,शांती,अहिंसा,बुद्धिवाद,विज्ञानवाद या सांविधानिक मूल्यांना कुठलेही स्थान नसते. 

       इतिहासकाळात इथल्या वर्णजातिव्यवस्थेने भारतातील बहुसंख्य लोकांचे मानवी हक्क हिरावून घेतले.त्यांचे अमानुष शोषण केले.त्यामुळे भारतातील शूद्रादिअतिशूद ठरवलेले पुरुष आणि सर्व स्त्रिया हीन,दीन,दलित राहिल्या,हे या संविधानद्रोही लोकांना माहीतच नसते.माहित असले तरी त्यांच्याबद्दल यांच्या मनात कुठलीही आस्था नसते. 

        आपल्या आधुनिक राष्ट्रनिर्मात्यांनी भारताचे माणसाला माणसापासून तोडणारे,माणसांच्या शोषणाला मुक्त मुभा देणारे भयंकर असे विषमतावादी समाज वास्तव लक्षात घेतले.हे घातक स्वरूपाचे समाज वास्तव बदलण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्धिक नेतृत्वाखाली अत्यंत विचारपूर्वक भारताचे संविधान निर्माण केले. 

        भारताचे संविधान विविधतेने नटलेल्या आणि जात,धर्म,भाषा इत्यादी गोष्टींनी परस्परांपासून तुटलेल्या लोकांना एकराष्ट्रीयत्वाच्या पक्व धाग्यात गुंफते.प्रगतीच्या प्रवाहात ज्यांना जाणीवपूर्वक मागे ठेवले त्यांच्या प्रगतीची विशेषत्वाने काळजी घेते.

        त्यामुळे जुन्या मनूवाद्यांच्या पोटात जळते.म्हणून हे मनुवादी संविधान विरोधाची भाषा करतात. अशा प्रवृत्तींचा मी पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो.शासनाने स्वतःहून या संविधानद्रोही लोकांच्या विरोधात कडक कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी करतो.