गडअहेरीतील पाणी समस्या केव्हा सुटणार? 

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी :-नगरपंचायत अहेरी अधिकारक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गडअहेरी येथे मागील अनेक वर्षापासून पाण्याची भीषण समस्या कायम आहे. ऊन्हाळ्यात तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सदर गाव नगर पंचायत हस्तांतरीत होऊन 9 वर्षाचा कालावधी लोटत आलेला आहे. मात्र प्रशासनाद्वारे आजतागायत यावर उपाययोजना न केल्याने गडअहेरीतील पाणी समस्या ऊग्ररुप धारण करीत आहेत. 

 गडअहेरी येथे 2014 ग्रामपंचायत अस्तित्वात होती. यादरम्यानही गावाला नियमित पाणी पुरवठा होत नव्हता. त्यानंतर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात आले. या हस्तांतरणामुळे गावातील पाण्याची समस्या सुटेल अशी भ्रामक आशा ग्रामस्थ बाळगून होते. मात्र 9 वर्षाचा कालावधी लोटूनही गावालात नियमित पिण्याचे पाणी मिळालेले नाही. गावात एक कुपनलिका असून ती गाव शिवा-यावर आहे. याच कुपनलिकेवर संपूर्ण ग्रामस्थ पाणी भरत असतात. मात्र एकच हातपंप असल्याने महिलांमध्ये पाण्यासाठी नेहमीच भांडण होत असतात. परिणामी ग्रामस्थांना गावालगत असलेल्या नाल्यावर पिण्याच्या पाण्याची तृष्णा भागवावी लागत आहे. मात्र नाल्याचे पाणी दुषित राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. 

 पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत प्रश्न सवोडविण्यासाठी वारंवार स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपंचायतीकडे अनेकदा निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. मात्र तात्पूरता सोय करुन प्रशासन हात झटकून घेत आहे. कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याने मागील गडअहेरीतील पाणी समस्या केव्हा सुटणार? असा उद्विग्न सवाल स्थानिक महिलांसह नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.

बॉक्ससाठी…

भीषण टंचाईत तात्पूरता टॅंकरचा आधार

गडअहेरीवासीयांना मागील अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दररवर्षी ऊन्हाळ्यात तर ग्रामस्थांना प्रचंड पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. या कालावधीतील ग्रामस्थांचा रोष बघून नपं प्रशासनाद्वारे तात्पूरत्या स्वरुपात पाण्याचे टॅंकर बोलावून रहिवासीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र काही दिवसानंतर पुन्हा परत तीच स्थिती निर्माण होते. परिणामी ग्रामस्थांना नेहमीच पाण्याच्या दुष्काळाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे नपं प्रशासनाप्रती रहिवासीयांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आला आहे.

बॉक्ससाठी…

स्वतंत्र पाण्याची टाकी उभारा

गडअहेरीवासीयांना दरवर्षी पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत तर महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाण्याची भीषण टंचाई सोडविण्यासाठी गडअहेरी येथे स्वतंत्र पाण्याची टाकी निर्माण ती प्राणहिता नदीपात्राला जोडणे आवश्यक आहे. प्राणहिता नदी गावापासून केवळ 1 किमी अंतरावर असल्याने पाण्याची समस्या दूर सारता येऊ शकते. तसेच सदर टाकी उभारणी होईस्तोवर शहरी पाणी पुरवठा योजनेला नळ जोडणी करुन गडअहेरीतील पाणी टंचाई टाळता येऊ शकते. मात्र या उपाययोजप्रती नपं प्रशासन उदासीन धोरण बाळगूण आहे. त्यामुळे गडअहेरी येथे स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्यात यावी, अशी मागणी आपण वने, सांस्कृतीक कार्य तसेच मत्सव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातून केली आहे.

संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते