जगदंब फाउंडेशन व बजरंग दलाच्या पुढाकाराने पशुधन तस्करावर कारवाई…. — कत्तलीसाठी तेलंगणात नेणाऱ्या गायींना जीवनदान…..

 

प्रितम जनबंधु

संपादक 

        गडचिरोली :– जगदंब फाउंडेशन सिरोंचा व बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी २५ सप्टेंबर रोजी सकाळी तमदाला फाट्यावर चारचाकी मालवाहू वाहन अडवून तपासणी केली असता त्यात चार गायी आढळून आल्या.

             प्राप्त माहितीनुसार सदर गायी तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेल्या जात होत्या. या प्रकरणात पाच जणांना पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वाहन चालक मोहम्मद ताज रा. तेलंगाणा, बापू कोंडागोर्ला, सुरेश कुम्मरी दोघेही रा. गर्कापेठा, बापू दुब्बाकी, वेंकटी गुरुनूले, रा. रंगय्यापल्ली, ता. सिरोंचा असे आराेपींची नावे आहेत.

           छत्तीसगड राज्याच्या सीमांना लागून असलेल्या गावांमधून जनावरे खरेदी करून ती टीएस १९ टी ४८३३ क्रमांकाच्या चारचाकी मालवाहू वाहनाने तेलंगणा राज्यात नेली जात असल्याची गोपनीय माहिती जगदंब फाउंडेशन सिरोंचा व बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी तमदाला फाट्याजवळ सापळा रचून वाहनाची तपासणी केली. त्यात चार गायी आढळून आल्या.

          सदर वाहनचालकाकडे जनावरांच्या खरेदीची कागदपत्रे व वाहनाचे ही कागदपत्रे आढळून आली नाहीत. सदर बाब सिरोंचा पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर गायी गाेशाळेत पाठविल्या जाणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.

        गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. आता अनेकांना हे पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते विक्री करतात. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या परिसरात जनावरे स्वस्त मिळतात. तसेच दुर्गम भागातून सिरोंचा मार्गे वाहन थेट तेलंगणा राज्यात जाते. त्यामुळे जनावरांची खरेदी करून तेलंगणा राज्यात विक्री करणारे अनेक दलाल ग्रामीण भागात तयार झाले आहेत. हे दलाल राज्याची सीमा ओलांडेपर्यंत वाहनासोबत असतात. त्यानंतरची जबाबदारी तेलंगणातील दलाल उचलतात. कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात पशुधन नेला जात असल्याने पशुधनाची संख्या झपाट्याने कमी होत चालली असल्याचे बोलल्या जात आहे.