गडचिरोली जिल्हा बँकेला ‘बँको ब्ल्यु रिबन’ पुरस्कार जाहीर….

 

प्रितम जनबंधु

   संपादक 

              देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्‍या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी ‘बँको ब्ल्यु रिबन’ पुरस्कार देण्यात येतो.

            ३१ मार्च २०२३ च्या आर्थिक स्थितीवर ठेव वृद्धी श्रेणीतील बँको ब्ल्यु रिबन राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग आठव्या वर्षी जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण ५ ऑक्टोबर रोजी दमण येथे होणार आहे.

           देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या श्रेणीत ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षात २ ते ३ हजार रुपये कोटींच्या ठेवी असलेल्या श्रेणीमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेव वृद्धी तसेच रिजर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार बँकेचे एन.पी.ए.चे प्रमाण, सी. आर. ए. आर. आदी निकषात बँक पात्र झालेली असून ३१ मार्च २०२३ च्या आर्थिक स्थितीवर बँकेचे ग्रॉस एन.पी.ए. १.१३ टक्के आहे. बँकेने आर्थिक निकषात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरचा सन २०२३ या वर्षाचा बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार जाहीर केलेला आहे. 

         यापूर्वी बँकींग फ्रंटीअर्स तर्फे सन २०१८ व २०२२ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार व सन २०१६ ते २०२२ पर्यंत बँकेला सलग ७ वर्षे बँको ब्ल्यु रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बँकेला नुकताच २०२१-२२ या वर्षात वित्तीय समावेशन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाबार्डकडून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

           गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५५ शाखा व ३५ ए. टी. एम. च्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनिक बँकींग सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. बँकेने ३१ मार्च २०२३ च्या आर्थिक स्थितीवर ३ हजार रुपये कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. 

           जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य व हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्यामुळे बँकेला सन २०२३ चा बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

              याबाबत बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार यांनी आभार मानले आहे.