आपले बाळ ठणठणीत राहण्यासाठी मोफत लसीकरण करा – आरोग्य विभाग

सतिश कडार्ला

जिल्हा प्रतिनिधी 

गडचिरोली,(जिमाका)दि.25: नवजात बालकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्यावतीने नियमित लसीकरण कार्यक्रम राबविल्या जातो. सदर कार्यक्रमादरम्यान प्रत्येक नवजात अर्भकाला लस दिली जाते. गेल्या आर्थिक वर्षात लसीकरण 98.16 टक्के इतके झालेले आहे. बालकांच्या जन्मापासुन 24 महिण्यापर्यंत नियमित लसीकरण केल्या जाते. याअंतर्गत आरोग्य यंत्रणेमार्फत शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक महिण्याच्या दर मंगळवारी व शुक्रवारी लसीकरण मोहिम राबविली जाते. सन 2022-23 मध्ये 19,132 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. बालकांचे लसीकरण पूर्णपणे मोफत असून जिल्हयातील सर्वच आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असते. बाळांचे नियमित व संपूर्ण लसीकरण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ग्रामीण भाग तसेच शहरी भागामध्ये सर्व सरकारी आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

   मोफत लसीकरण कोठे?

• बाळांना पहिल्या दिवसापासुन सुरु होणारे लसीकरण आरोग्य उपकेन्द्र, प्राथमिक आरोग्य केन्द्र, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच नुकत्याच सुरु झालेल्या आपला दवाखाना येथेही मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

 

बालकांना देण्यात येणाऱ्या लसीकरणाचे वेळापत्रक

अ.क्र. बालकाचे वय लस व लसीचा उपयोग

1 जन्मत: बीसीजी- क्षयरोग प्रतिबंध

ओपीव्ही 0 – पोलिओ आजारास प्रतिबंध

हिपॅटाईटीस जन्म डोस- काविळ आजारास प्रतिबंध

2 दिड महिने

(6 आठवडे) ओपीव्ही-1- पोलिओ आजारास प्रतिबंध

 रोटा-1- जंतुसंसर्गाव्दारे होणारी हगवन प्रतिबंधात्मक

 एफआयपीव्ही-1- पोलिओ आजारास प्रतिबंध

 पीसीव्ही-1- न्युमोनिया बॅक्टेरीयामुळे होणारे आजार प्रतिबंधक

 पेन्टा-1- डिप्थेरीया, पर्टुसीस, टिटॅनस हे आजार प्रतिबंधक

3 अडिच महिने

(10 आठवडे) ओपीव्ही-2- पोलिओ आजारास प्रतिबंध

 रोटा-2- जंतुसंसर्गाव्दारे होणारी हगवन प्रतिबंधात्मक

 पेन्टा-2- डिप्थेरीया, पर्टुसीस, टिटॅनस हे आजार प्रतिबंधक

4 साडे तीन महिने

(14 आठवडे) ओपीव्ही-3- पोलिओ आजारास प्रतिबंध

 रोटा-3- जंतुसंसर्गाव्दारे होणारी हगवन प्रतिबंधात्मक

 एफआयपीव्ही-2- पोलिओ आजारास प्रतिबंध

 पीसीव्ही-2- न्युमोनिया बॅक्टेरीयामुळे होणारे आजार प्रतिबंधक

 पेन्टा-3- डिप्थेरीया, पर्टुसीस, टिटॅनस हे आजार प्रतिबंधक

5 9 महिने विटॅमिन ए – रातआंधळेपणा प्रतिबंध

 एमआर-1- गोवर- रुबेला आजारापासुन प्रतिबंध

 पीसीव्ही बुस्टर- न्युमोनिया बॅक्टेरीयामुळे होणारे आजार प्रतिबंधक

 जेई-1- मेंदुज्वर प्रतिबंध

 एफआयपीव्ही-3 बुस्टर- पोलिओ आजारास प्रतिबंध

6 16 ते 24 महिने ओपीव्ही बुस्टर डोस- पोलिओ आजारास प्रतिबंध

एमआर-2- गोवर- रुबेला आजारापासुन प्रतिबंध

जेई-2 – मेंदुज्वर प्रतिबंध

डीपीटी पहिला बुस्टर डोस – डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात प्रतिबंध

7 5 ते 6 वर्ष डीपीटी दुसरा बुस्टर डोस – डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात प्रतिबंध

8 10 वर्ष टीडी-10 – धनुर्वात प्रतिबंध

9 16 वर्ष टीडी-16 – धनुर्वात प्रतिबंध

 

बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण करणे का आवश्यक आहे?

• लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले रोग- घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर-रुबेला, मेंदुज्वर, हगवन, काविळ, पोलिओ ईत्यादी आजार लसीकरणाने टाळता येतात.

• आजार होण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक आहे. सर्व सरकारी आरोग्य संस्थामध्ये या लसी मोफत मिळतात.

बाळाचा एकही डोस चुकवू नका

 लहान बाळाची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी लसीकरण करण्यात येते. तसचे एखादा आजार झाल्यास त्याची तिव्रता कमी असावी हा उद्देशही असतो, त्यामुळे बाळाचा एकही डोस चुकवू नये असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी यांनी आवाहन केले आहे .