Home आरोग्य छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिवस साजरा…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिवस साजरा…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

          आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वतःकडे व आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या निमित्ताने सर्व समाजाला आरोग्याचे महत्व पटले आहे, परंतु तरी काही कारणास्तव आपण आरोग्याची तपासणी करण्याचे टाळतो. महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी त्यांच्या आरोग्याकडे गांभिर्याने बघताना दिसून येत नाही. विशेष करून विद्यार्थीनी आपल्या अडचणी कोणालाच सांगत नाही.

           तसेच कर्मचारी यांचेही आरोग्य सुस्थितीत ठेवणे, हे महाविद्यालयाचे कर्तव्य आहे, यासर्व गोष्टीचा आढावा लक्षात घेता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब, गृहअर्थशास्त्र विभाग व प्राथमिक आरोग्य केन्द्र संयुक्त विद्यमाने 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.

           या निमित्ताने महाविद्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात 79 विद्यार्थी व 15 कर्मचारी यांनी या शिबीराचा लाभ घेतला.

          शिबीरामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे वजन, उंची, रक्तदाब, शुगर लेव्हल, ऑक्सीजन लेव्हल, नाडी, रक्तगट इ. तपासण्यात आले तसेच आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी व एच.पी.व्ही. लसीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

            कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.रविंद्र इचे , प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश तायडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शरीरात होणारे बदल व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून रोगनिदानाअंती उपचार सुचविले, प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगाव पूर्णा येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडेस्वार, डॉ. पारणकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नितेश डहाके, सुनिल दिवान, श्रीमती मंगला पडोळे यांचे सहकार्य लाभले.

          कार्यक्रमाचे संचालन रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आशिष काळे यांनी केले, प्रास्ताविकातून कार्यक्रमामागची भूमिका व उद्देश क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरीश काळे यांनी मांडली तर प्रा. डॉ. भारत कल्याणकर यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.