इंदापूर तालुक्याच्या 10 वर्षांमध्ये सर्वांगीण विकास खुंटला :- हर्षवर्धन पाटील… — शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना जनता जागा दाखवून देईल :- हर्षवर्धन पाटील.. — नीरनिमगाव येथे रु.11 कोटी 23 लाखांची विकास कामे….

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

               इंदापूर तालुक्याच्या गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वांगीण विकास खुंटला आहे. उलट तालुक्यात अलीकडच्या काळात विरोधकांकडून अरे तुरे ची व शिवराळ भाषा वापरली जात आहे. इंदापूर तालुक्याची शिवराळ भाषा ही राजकीय संस्कृती नाही. अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.23) दिला.

          निरनिमगाव येथे एकूण रु. 11 कोटी 23 लाख रक्कमेच्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना व बावडा-निरनिमगाव रस्त्याचे भूमिपूजन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, आंगणवाडी केंद्र इमारतीचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी सत्तेवर असताना 20 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर केला.

         ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील युवकांची बेरोजगारी, शेतीच्या पाण्याचा, शिक्षण, आरोग्य आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात तालुक्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आम्ही सत्तेवर असताना गाव तिथे रस्त्याची केलेली कामे 15 ते 20 वर्षे टिकली आहेत. मात्र आता शासन रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे, मात्र कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. बावडा-निरनिमगाव रस्त्याला महायुतीचे सरकारी येण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे श्रेय कोणी घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे देशात व राज्यात भाजपचा जनाधार वाढत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

        प्रास्ताविक निरा भिमा कारखान्याचे संचालक व सरपंच प्रतापराव पाटील यांनी आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव देवडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, दत्तू सवासे, दयानंद गायकवाड, रणजीत वाघमोडे, नागेश नष्ट्ये, विठ्ठल घोगरे, संतोष सुर्यवंशी, रणजीत गिरमे, ग्रामविकास अधिकारी सागर सवासे, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.