मौजा पारडपार येथील श्री.विठ्ठल जिवतोडे यांच्या शेतातून हजारो ब्रास मुरुमांचे अवैध उत्खनन… — एम.के.एस.कंपनीच्या कंत्राटदारांचा प्रताप.. — विकासकामे आणि चोरीचा मटेरियल.‌.. — चिमूर तालुक्यातील संबंधितांचा दुर्लक्षितपणा कुणा-कुणाला बनवतोय मालामाल? — चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा लक्ष देतील काय? — प्रकरण २…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

            गौण खनिज सरकारी जागेतील असो की खाजगी जागेतील असो,तहसीलदार कार्यालयातंर्गत पुर्व परवानगी घेतल्याशिवाय उत्खनन करता येत नाही.

           मात्र,चिमूर तालुका या बाबीला अपवादक ठरु लागला आहे.कुणीही येतो आणि कुठुनही वाळू आणि मूरुम यासारख्या गौण खनिजांचे उत्खनन करून परस्पर विल्हेवाट लावतो आहे म्हणजेच बरेच व्यक्ती चोरटा व्यापार बिनधास्तपणे करीत असल्याचे सर्वत्र चित्र चिमूर तालुक्यातील आहे.

          एम.के.एस.कंपनीचे संचालक तर कमालच करीत आहेत.विकास कामाच्या नावावर त्यांनी तर अख्या चिमूर तालुक्यातील गौण खनिजावर डल्ला मारत जागोजागून मुरुमांचे अवैध उत्खनन सर्रासपणे केले असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

            जसे काही चिमूर तालुक्यातील गौण खनिजाला स्वतःच्या मालकी हक्काची मालमत्ता असल्याची ते समजत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसतो आहे.

             जांभुळघाट तलाठी साझातंर्गत मौजा पारडपार येथील श्री.विठ्ठल शेगो जिवतोडे यांच्या शेतातून एम.के.एस.कंपनीच्या कंत्राटदारांनी हजारो ब्रास मुरुमांचे अवैध उत्खनन केले असल्याचा दुसरा गंभीर प्रकार पुढे आला आहे.

            रास्ता मजबुतीकरण करण्यासंबंधाने संबंधित कार्यालयाद्वारे अंदाज पत्रकीय आराखडा प्रत तयार केली जाते व या अंदाज पत्रकीय आराखडा प्रत नुसार शासकीय-प्रशासकीय स्तरावरुन आवश्यक निधी सदर कामासाठी मंजूर केला जातो.या मध्ये इतर सर्व खर्चासह,सर्व मटेरियलचा खर्च समाविष्ट केलेला असतो.

             असे असताना एम.के.एस‌.कंपनीचे संचालक तथा रस्ता कंत्राटदार जागोजागी अवैध उत्खनन करून चोरीच्या मुरुमांचा उपयोग रस्ता मजबूतीकरणाच्या कामासाठी का म्हणून करतात?हा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे.

             आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीचा मटेरियल चिमूर तालुक्यातील रस्ता मजबूतीकरणाच्या कामासाठी उपयोगात आणले जात असताना चिमूर तालुक्यातील तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,नायब तहसीलदार,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी व इतर सर्व संबंधितांना साधी भनक लागत नाही,याला काय म्हणायचे?

           “आंधळा पिठ दळतो व कुत्रा पिठ खातो,असी अवस्था चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांची केली आहे काय? आणि असी दैन्यावस्था केली असेल तर कुणी केली? असे असेल तर मग त्या मोठ्या चोरांचे व मोठ्या शिरजोराचे नाव समोर यायलाच पाहिजे.

           कारण हे चोर व शिरजोर चिमूर तालुक्यातील गौण खनिजामुळे मालामाल होतात व सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा स्वतःच्या नियंत्रणात असल्याच्या आविर्भावात वागतात.यामुळे नागरिकांच्या मनातून अधिकारी व कर्मचारी उतरुन जातात हे वास्तव आहे.

            चिमूर तालुक्यातंर्गत अधिकारी व कर्मचारी हे अवैध उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विशेष पथक तयार करून चिमूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण आणावे असी आर्त हाक चिमूर तालुक्यातील नागरिकांची,”त्यांना आहे,…