दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : दिवाळी सणाच्या आनंदात समाजातील सर्व घटक सहभागी व्हावेत, यासाठी आळंदीतील नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे व जय गणेश ग्रुप यांच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम राबवत आशासेविका आणि रुग्णसेविका भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली. आरोग्यसेवेच्या आघाडीवर दिवसरात्र कार्यरत असलेल्या या भगिनींच्या सेवाभावाचा सन्मान करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. सणासुदीच्या वातावरणात आपुलकी, कृतज्ञता आणि भावबंधाचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
यावेळी आशासेविका आणि रुग्णसेविकांनी योग्य सन्मान करुन भाऊबीज साजरी केली. मिठाई वाटप, स्नेहसंमेलन आणि आनंदी संवादाने वातावरण अगदी उत्साहाने रंगून गेले. प्रशांत कुऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आरोग्य सेवेतील आशासेविका व रुग्णसेविका या समाजाच्या खरी ‘आरोग्यरक्षक भगिनी’ आहेत. घराघरात आरोग्यसेवेचा संदेश पोहोचवणाऱ्या या भगिनी दिवसरात्र कर्तव्यनिष्ठेने काम करतात. त्यांचा हा सन्मान म्हणजे समाजाच्या सेवाभावाला सलाम करण्याचा प्रयत्न आहे.”
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा गौरव करणारा आणि समाजातील जिव्हाळा टिकवणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. “भाऊबीज हा सण फक्त नात्यातील प्रेम व्यक्त करण्यापुरता मर्यादित नसून, तो परस्पर सन्मान आणि आदर यांचा उत्सव आहे,” अशी भावना या वेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली. या उपक्रमात विविध आशा व रुग्णसेविका बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे आयोजन जय गणेश ग्रुप व नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.



